Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.
ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती. या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली होती.

या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील वेलशेत, तळाघर, ऐनघर, पळस, टेमघर, पाटणसई या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार तलाठी सजा वेलशेतसाठी क्षेत्र ०.०३०० हे.आर., तळाघर येथील तलाठी सजा तळाखारसाठी क्षेत्र ०.०३०० हे.आर., ऐनघरसाठी तलाठी सजा क्षेत्र ०.०३०० हे.आर., तलाठी सजा पळस साठी क्षेत्र ०.०३०० हे.आर., तलाठी सजा टेमघरसाठी क्षेत्र ०.०३०० हे.आर., तलाठी सजा पाटणसईसाठी क्षेत्र ०.०३०० हे.आर. ही जमीन महसूल मुक्त व सारा माफीने संबधित तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

यामुळे खऱ्या अर्थाने महसूल प्रशासन गतिमान होऊन जनतेला महसूल विषयक सोयी सुविधा सुलभतेने मिळतील. विविध प्रशासकीय कार्यालयांच्या नव्या इमारतीसाठी व अद्ययावतीकरणासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासन निश्चितच गतिमान होण्यास मोठा हातभार लागणार आहे. रोहा तालुक्यातील तलाठी सजांना स्वतःची जागा मिळून ही कार्यालये लोकाभिमुख कामांसाठी उपयोगी ठरतील या भावनेने त्या त्या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.