Press "Enter" to skip to content

एसटीच्या नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर सेवानिवृत्त

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारांतर्गत असलेल्या नागोठणे एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक व नागोठण्याजवळील कानसई गावातील मूळ रहिवासी असलेले चंद्रकांत भोईर हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मंगळवार दि. ३१ आॅगस्टला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने एसटीच्या नागोठणे स्थानकात त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातील त्यांच्या सेवानिवृत्त निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नागोठणे एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्षात झालेल्या या छोटेखानी निरोप समारंभाला नागोठणे एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे, एसटी चालक खेळू भोय, चालक कैलास पाटील, एसटी वाहक हेमंत कदम, वाहक गणेश मोकल, वाहक प्रसाद पाटील, वाहक योगिता पाटील, सोष्टे गुरुजी, नागोठणे एसटी स्थानकातील सफाई कामगार प्रणाली खैरे आदींसह प्रवासी यावेळी उपस्थित होते.

चंद्रकांत भोईर यांनी एसटीचे वाहक म्हणून एसटीच्या कर्जत आगारात दोन वर्षे व रोहा आगारात २२ वर्षे अशी एकूण २४ वर्षे तर वाहतूक नियंत्रक म्हणून नागोठणे एसटी स्थानकात १० वर्षे सेवा केली आहे. नागोठणे एसटी स्थानकात वाहतूक नियंत्रक पदावर काम करतांना त्यांनी प्रवाशांच्या सोयी-सुविधा, प्रवाशांच्या अडचणी यांकडे नेहमीच जातीने लक्ष दिले आहे.

नागोठणे एसटी स्थानकाबद्दल भोईर यांना नेहमीच आपलेपणाची भावना होती. याच आपलेपणाच्या भावनेतूनच त्यांनी वाहतूक नियंत्रक कक्षात वाहतूक नियंत्रकांसाठी असलेली खुर्ची मोडकळीस आल्याने तसेच भविष्यात या खुर्चीवर आपल्याला बसायला मिळणार नाही हे माहित असूनही भोईर यांनी वाहतूक नियंत्रकांसाठी चांगल्या प्रतीची नवीन खुर्ची भेट म्हणून दिली. त्यासाठी वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांनी त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.