Press "Enter" to skip to content

दफ्तराची पळवापळवी प्रकरणी कारवाईस विलंब : उलट-सुलट चर्चेला उधाण

ऐनघर दफ्तर पळवापळवी प्रकरणातील दोषींवर कारवाईकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष



सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

ऐनघर ग्रामपंचायतीच्या दफ्तर पळवापळवी प्रकरणाला पाच दिवस उलटूनही याप्रकरणी दोषी असलेले ऐनघरचे ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे व इतरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणातील संबधित सर्व दोषींवर कारवाई होण्यास विलंब होत असल्याने ऐनघर विभागात सध्या उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रोहा तालुक्यात “श्रीमंत ग्रामपंचायत” अशी ओळख असल्याने नेहमी कोणत्या ना कारणाने गाजत असलेली ऐनघर पंचायत दफ्तर पळवापळवी प्रकरणानंतर सध्या तर तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही चर्चेचा विषय ठरली. ग्रामपंचायतीचे जे दफ्तर ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यास सांगितले होते त्यामध्ये सन २०१९-२० या वर्षातील अनेक महत्वाच्या दस्तऐवजांचा समावेश होता.

हे दफ्तर या आधीच्या संबधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मागितल्यानेच त्यांच्याकडे आपण ते कर्मचाऱ्यांमार्फत रोहा येथे पाठविण्यासाठी दिले होते व अशाप्रकारे हे दफ्तर पाठविणे ही माझी चूक असल्याचे तसेच यापुढे ग्रामपंचायतीचे दफ्तर कुणाच्याही ताब्यात दिले जाणार नाही याची जबाबदारी घेतली जाईल असा लेखी जबाब ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांनी विद्यमान ग्रामपंचायत कमिटीला दफ्तर पळवापळवी प्रकरणाच्या त्याच दिवशी २७ ऑगस्ट, २०२१ ला दिला आहे. तर हे दफ्तर ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांच्या सांगण्यावरून याआधीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारचालकाकडे देण्यासाठी जात असल्याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जबाब तसेच हे दफ्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मागविले नसल्याचा दिलेला लेखी जबाब रोहा पंचायत समितीमध्ये त्याच दिवशी २७ ऑगस्टला विस्तार अधिकारी जी. एल. वायाळ यांच्याकडून देण्यात आला आहे.

अशाप्रकारे ऐनघर ग्रामपंचायतीचे दफ्तर पळवापळवी प्रकरणात कोणकोण सहभागी आहेत, कुणाला वाचविण्यासाठी हे प्रकरण घडवून आणले जात होते, या प्रकरणाचा नक्की कोणाला फायदा होणार होता तसेच या दफ्तर पळवापळवी प्रकरणाची मोहीम फत्ते करण्यात कुणाचे हितसंबध होते व यामुळे कुणाला आर्थिक फायदा होणार होता हे सर्व जनतेमध्ये उघड झाले असून तशी चर्चाही ऐनघर, सुकेळी भागात रंगवून सांगितली जात आहे. असे असतांनाही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून का टाळाटाळ करण्यात येत आहे हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान यासंदर्भात रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी.एल. वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी ऐनघरचे ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.