ठाणे येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर दि.30 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध म्हणून कर्जत नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून काळ्या फिती लावून झालेल्या घटनेच्या जाहीर निषेध केला आहे.

दिनांक 30 ऑगस्ट 2019 रोजी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील मुजोर फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांच्या अंगरक्षक यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून दोघांना गंभीर दुखापत केली, हा प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे याचा निषेध म्हणून कर्जत नगरपरिषद मधील अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना व लेबर फ्रंट कर्मचारी युनियनच्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील घटनेचा तीव्र निषेध करून कामबंद आंदोलन केले व काळ्या फिती लावून निषेध केला आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना कर्जत युनिट अध्यक्ष जितेंद्र गोसावी, उपाध्यक्षा रिशिता शिंदे, सचिव विशाल पाटील,सदस्य अरविंद नातू तर लेबर फ्रंट कर्मचारी युनियचे अध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना निवेदन दिले. सदर निवेदनात घटनेचा निषेध करून सदर प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.या निवेदनाची प्रत रायगड जिल्हा कार्यकारणी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिले आहे.








Be First to Comment