पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीत गोकुलाष्टमी व गणेशोत्सव सण कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन साजरे करा
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळेच कोरोनाच्या विषाणूच्या याच पार्श्वभूमीवर आगामी गोकुलाष्टमी व गणेशोत्सव सण पिगोंडे ग्रामपंचायत हद्दितील सर्व नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड १९ च्या नियमांचे पालन करुन साजरे करावेत असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने वेलशेत पोलिस दुरक्षेत्र मधील सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांनी केले.पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक, सहाय्यक फौजदार प्रमोद कदम, पिगोडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई जनार्दन कोळी, उपसरपंच नाना बडे, सदस्य सखाराम घासे, सौ. कांचनताई माळी आदींसह वेलशेत व आंबेघर गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नागोठणे पोलीस ठाण्याच्या वेलशेत दुरक्षेत्रच्या वतीने सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांनी यावेळी वेलशेत व आंबेघर येथील ग्रामस्थांना गोविंदा आणि गणेशोत्सव साजरा करताना, कोरोना – डेल्टा प्लस महामारीचा झपाट्याने होणारा प्रसार, या संदर्भात नागरिकांनी पालन करावयाचे शासकीय आदेश, नियमावली याबाबत कदम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सोशल डिस्टंसिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनेटायझर चा वापर या विषयी महत्वपूर्ण सुचना त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय श्री गणेशाची मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त असू नये असेही त्यांनी आवर्जून सांगितले. कायदा व सुव्यवस्था आपल्या सण उत्सवात बिघडू नये यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.








Be First to Comment