Press "Enter" to skip to content

ऐनघर ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब करण्याचा ग्रामविकास अधिकाऱ्यांचा प्रयत्न

ग्रा.पं. सदस्य किशोर नावले व प्रकाश डोबळे यांनी कट आणला उघडकीस

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रोहा तालुक्यात “श्रीमंत ग्रामपंचायत” अशी ओळख असलेली नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. याच ऐनघर ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे व त्यांची चौकशी सरकारी दरबारी प्रलंबित असतांनाच ऐनघर ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब करण्याचा निष्फळ प्रयत्न ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांनी शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी केला. मात्र ग्रामपंचायतीचे जागरूक सदस्य किशोर नावले व प्रकाश डोबळे यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यामुळे ग्रामपंचायतीचे दस्तऐवज गायब होण्यापासून वाचले असले तरी हा प्रकार गंभीर असल्याने ऐनघर पंचक्रोशीत खळबळ निर्माण झाली आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना ग्रा. पं. सदस्य प्रकाश डोबळे व किशोर नावले यांनी सांगितले की, ऐनघर ग्रामपंचायतीच्या विकास कामांसंदर्भातील महत्वाचे दस्तऐवज असलेले दफ्तर ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांच्या आदेशाने व लेखनिक उत्तम जाधव यांच्या सहकार्याने कर्मचारी सुरेश सुटे व राजेंद्र जाधव मोटारसायकलवरून २७ ऑगस्टला लंपास करून नेत होते. हा प्रकार मासिक बैठकीसाठी ग्रामपंचायतीमध्ये आलेले ग्रा.पं. सदस्य किशोर नावले व प्रकाश डोबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्यांना ऐनघर फाट्याजवळ दुपारी तीन वाजता रंगेहात पकडले. त्यामुळे ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती राजेंद्र कोकळे व इतर सर्व सदस्य अत्यंत संतप्त झाले. त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नंतर त्यांना सुनावले की, याआधीच्या कमिटीने काय केले ते त्यांनाच माहित. परंतु गावाच्या विकासासाठी जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले असून ऐनघर ग्रामपंचायत आम्हाला भ्रष्टाचारमुक्त करायची आहे. ग्रामपंचायत हद्दीत न भूतो ना भविष्यती असा विकास आम्हाला करायचा आहे असेही निक्षून सांगितले. तसेच शासकीय कागदपत्रके गायब करणे हा गुन्हा असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारदाखल करण्यासंदर्भात कमिटी लवकरच निर्णय घेईल असेही डोबळे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस सरपंच कलावती कोकळे यांचे पती राजेंद्र कोकळे, सदस्य रोहिदास लाड, किशोर नावले, प्रकाश डोबळे, सचिन भोसले, विनोद निरगुडे, विठ्ठल इंदुलकर, जगन कोकळे, जितेंद्र धामणसे, भगवान शिद, लक्ष्मण मोहिते, खेळू खांडेकर, महादेव करंजे, नारायण मोहिते, ऐनघर शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप मोहिते, सुकेळी शाखाप्रमुख किशोर तेलंगे, भास्कर लाड, राजू जंगम, भास्कर बावदाने, आवेश कोकळे, सुरेश वाघमारे, ज्ञानेश्वर जवके, हेमंत शिरसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश डोबळे यांनी पुढे सांगितले की, मासिक मिटिंगसाठी मी कार्यालयात आलो होतो. परंतु ग्रामपंचायतीच्या सभागृहात महिला बचत गटाची मिटिंग सुरु होती म्हणून मी ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनात बसलो. त्यावेळी लेखनिक उत्तम जाधव ग्रामपंचायतीचे दफ्तर बांधत होते. त्यासंदर्भात मी विचारले असता, दफ्तर व्यवस्थित ठेवण्यासाठी बांधत असल्याचे लेखनिकाने मला सांगितले. परंतु काहीतरी गडबड असल्याचे काही क्षणातच माझ्या लक्षात आल्याने मी ग्रामपंचायत सदस्य किशोर नावले यांना बोलावले व दफ्तर घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ऐनघर फाट्यावर गाठले. रोहा पं. स. चे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी दफ्तर मागितले म्हणून आम्ही घेऊन जात असल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना घेऊन रोहा गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर आपण हे दफ्तर मागितले नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले असेही प्रकाश डोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ऐनघर ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांनी ग्रामपंचायत सरपंच कलावती कोकळे व सदस्य यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता ऐनघर ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून सन २०१९-२० या कालावधीतील दफ्तर कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामपंचायत कार्यालयातून हलवण्याचा प्रयत्न केला. या दफ्तरामध्ये १४ वा वित्त आयोग साठा रजिस्टर, ग्रामनिधी साठा रजिस्टर, न.बं ६ वर्गीकरण फाईल, नोकर पगार रजिस्टर, व्हावचर फाईल नंबर १, व्हावचर फाईल नं. २, मासिक सभा प्रोसिडिंग, सॅनिटायझर वाटप फाईल, प्राथमिक शाळा/ अंगणवाडी साहित्य वाटप १०% रजिस्टर, प्राथमिक शाळा टेबल-खुर्ची -कपाट वाटप फाईल, १४ वा वित्त आयोग फाईल, ट्युब साठा रजिस्टर, कोरोना संसर्ग मास्क वाटप रजिस्टर( १ ते ७), ग्रामनिधी विकासकामे फाईल (१ ते २४) आदी दस्तऐवजांचा समावेश होता.

दरम्यान याबाबत ऐनघर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजू श्रीरंग ढेरे यांच्याकडे विचारणा केली असता, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दिपक चिपळूणकर यांनी फोन करून मला २०१९-२० या कालावधीतील दफ्तर पाहिजे असल्याचे सांगितल्यानेच मी ते दफ्तर चपळूणकर यांच्याकडे देण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवले होते असे राजू ढेरे यांनी सांगितले. कुणाचेही व कोणतेही लेखी मागणी पत्र नसतांना दस्तऐवज पाठविण्याच्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान ऐनघर ग्रामपंचायतीचे २०१९-२० या कालावधीतील दफ्तर ग्रामविकास अधिकारी दिपक चिपळूणकर यांच्या सांगण्यावरून रोहा येथे देण्याकरिता नेण्यात आले होते. परंतु सदर दफ्तर पुन्हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच यापुढे ऐनघर ग्रामपंचायतीचे कुठलेही दफ्तर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही दिले जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. दिपक चिपळूणकर यांच्या सांगण्यावरून सदरचे दफ्तर दिले ही माझी चूक असून यापुढे तशी चूक होणार नाही असेही राजू ढेरे यांनी ग्रामपंचायतीच्या कमिटीला लेखी स्वरूपात लिहून देऊन माफी मागितली आहे. दरम्यान ग्रा.पं. सदस्य प्रकाश डोबळे व किशोर नावले यांनी दाखविलेल्या कर्तव्य दक्षतेमुळे ऐनघर पंचायतीचे महत्वाचे दफ्तर लंपास होण्यापासून वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर यासंदर्भात ऐनघरचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दिपक चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण अशाप्रकारे कोणतेही दफ्तर मागितले नसल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.