सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
खरीप हंगाम २०२१ मधील सर्व साधारण व आदिवासी गटासाठी पीक स्पर्धा कृषी विभाग यांच्याकडून आयोजित करण्यात आली असून त्या स्पर्धेत सर्व शेतकरी बांधवानी भाग घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यास प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत अन्न-धान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांची पीक निहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकते पेक्षा दिडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग घेऊन त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील.
तालुका स्तरावरील बक्षिसाची रक्कम रुपये प्रथम क्रमांक ५०००/-, द्वितीय क्रमांक रु. ३०००/- व तृतीय क्र. रु. २०००/- पर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. येत्या खरीप व रब्बी हंगामात आपल्या तालुक्यात भात, तुर व नाचणी या पिकांकरिता स्पर्धेचे आयोजन केले असून याकरिता १० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
ज्यांच्या नावावर शेती आहे व जे स्वतः शेती कसत आहेत असे सर्व शेतकरी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेणार्या शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर येथे स्वीकारले जात आहेत. याकरिता रक्कम रुपये ३००/- प्रवेश शुल्क असून अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर कार्यालयाशी संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये सहभागाची संधी ३१ ऑगस्ट अखेर आहे. पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी ०५ व आदिवासी गटासाठी ०४ आहे.
पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांनी आपल्या स्पर्धा प्लॉटच्या कापणी तारखा चालू परिस्थिती पाहून निश्चित कराव्यात व त्याबाबत लेखी सूचना तालुका कृषी अधिकारी यांना आठ दिवस अगोदर द्यावयाच्या आहेत. मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक हे कार्यक्षेत्रातील स्पर्धकांशी सतत संपर्क साधून प्लॉट कापणी बाबत जरूर ती सिद्धता स्पर्धकांच्या प्लॉटवर ठेवण्याबाबत कार्यवाही करतील.
पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाने स्पर्धेतून माघार घ्यावयाची झाल्यास कापणी पूर्व पंधरा दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकार्यास लेखी कळवावे तसेच माघार कोणत्या कारणासाठी घेतली हे स्पष्ट नमूद करावे. तरी खालापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी खालापूर अर्चना सुळ- नारनवर यांनी केले आहे.








Be First to Comment