Press "Enter" to skip to content

पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई-गोवा महामार्गावर धुळवड सुरु

दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना होतोय धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून उघडीप घेतल्याने मुंबई-गोवा महामार्गावर रखडलेल्या डांबरीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पायी चालत जाणा-यांना मोठ्या प्रमाणात या धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या विश्रांती पावसाची, धुळवड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची असे म्हणायची वेळ वाहन चालकांवर आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असतानाच यावर्षीच्या पहिल्या पावसातच महामार्गावर महाभयंकर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या पडलेल्या खड्डयांमध्ये संबंधित ठेकेदाराकडुन निकृष्ट दर्जाची खडी व माती वापरुन खड्डे भरण्यात आले होते. परंतु मध्यंतरी पडलेल्या जोरदार पावसामुळे व अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे या खड्डयांमधील खडी व माती रस्त्यावर आजुबाजुला पसरली आहे. त्यामुळे गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावर डोलवी ते नागोठणे व पुढे कोलाड दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोटच्या लोट दिसत आहेत.

तात्पूरत्या स्वरुपात बुजवण्यात आलेल्या खड्डयांमधील खडी व माती रस्त्यावरच पसरल्यामुळे अतिवेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी यांच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणात धुळ जात आहे. त्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

त्याचप्रमाणे याच धुळीमुळे दुचाकीस्वारांचे कपडे देखील मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. त्यामुळे पाऊस नसतांना देखील दुचाकीस्वारांना रेनकोटचा वापर करावा लागत आहे.

तसेच रस्त्यावर पडलेली मोठमोठी खडी रस्त्यावरुन चालत जाणा-या – येणा-यांना लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरुन अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्यामुळे दुचाकीस्वारांना व पायी चालणा-यांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित असणाऱ्या कंपनीने व ठेकेदाराने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही खड्डेमय महामार्गावर टँकरद्वारे पाण्याचा फवारा मारण्याची इंटरनॅशनल उपाययोजना लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी वाहनचालकांतुन होत आहे.

यासंदर्भात महामार्गाचे ठेकेदार जे.ए.म्हात्रे इन्फ्रा कंपनीचे वरिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता उडणा-या धुळीवर पाण्याचा फवारा मारण्यासाठी आमटेम व नागोठणे बाजूकडे दोन स्वतंत्र पाण्याच्या टँकरची व्यवस्था आजपासून सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.