गणेशोत्सवाच्या आधी सदर रस्ता सुस्थितीत झाला नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष वेधण्यासाठी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोंदिवडे व दहिवली कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करून गांधीगिरी केली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी हे रस्ते सुस्थितीत आणले नाही तर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
अनेक महिने राजमाता जिजाऊ उद्यान ते कोंडीवडे रस्ता तसेच उद्यान ते डोंबे विद्या निकेतन शाळेपर्यंतचा अतिशय खराब झालेला रस्ता या दहिवलीतील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे त्यातून सर्व सामान्य नागरिकांना होणारा त्रास या सर्व बाबींवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात सार्वजनिक विभागाचा धिक्कार करून प्रतिकात्मक स्वरूपात वृक्षारोपणाचा कार्यक्रम रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष रणजित जैन, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सोमनाथ पालकर, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, मिलिंद चिखलकर, रमाकांत कडू, नितीन दगडे, अशोक दिघे, समीर वांजळे, सुशील जाधव, मल्हारी माने, महेंद्र लाड, सुशांत लाड, नैनेश दिघे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमा नंतर झोपी गेलेल्या बांधकाम विभागाला जाग येण्यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन शाखा अभियंता अक्षय चौधरी यांनी स्वीकारले. यावेळी ‘जर गणेशोत्सवाच्या आधी सदर रस्ता सुस्थितीत झाला नाही तर पक्षाच्या वतीने उपोषण अथवा मोठे आंदोलन करण्यात येईल.’ असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून आज सकाळी आंदोलनापूर्वी ‘कर्जत – कोंदिवडे रस्ता ‘पुरवणी अर्थसंकल्प 2019’ मध्ये रस्ता मजबुतीकरणाचे काम मंजूर आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ उद्यान ते आकुर्ले, शिरसे, सांगवी व कोंदिवडे गावातील लांबीमध्ये काँक्रीटीकरण व उर्वरित लांबीमध्ये डांबरीकरण प्रस्तावित असून दहिवली परिसरामध्ये आर सी सी गटारे प्रस्तावित आहेत.
या रस्त्याच्या कामाची निविदा 3 जून 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम तात्काळ हाती घेण्यात येईल. सध्या खडी व ग्रीटने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम प्रगतीत आहे. त्यामुळे आपण आंदोलन करू नये.’ असे विनंतीपत्र जिल्हाध्य सुरेश लाड यांना दिले आहे.








Be First to Comment