शिवतिर्थावर भगवा फडकवणार – आ. महेंद्र दळवी
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
ज्याप्रमाणे शेकापचा राज्यात एकही आमदार निवडून आला नाही, त्याचप्रमाणे शेकापची उरलीसुरलेली जिल्हापरिषदेतील सत्ता घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे आव्हान स्वीकारुन आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना एक एक गड सर करीत असून याची सुरुवात शेकापचा बालेकिल्ला असलेल्या कुर्डुस मतदार संघातून झाली आहे. शेकापला जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर ठेवून शिवतिर्थावर शिवसेनेचा भगवा फडवणारच असे अभिवचन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी दिले आहे.

कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघातील कुर्डुस ग्रामपंचायत सदस्य तुषार शेरमकर, शेकापचे ज्येष्ठ नेते मोतीराम केणी, चंद्रकांत केणी, भुषण पाटील, राम ठाकुर, रामचंद्र शिंदे, महेंद्र म्हात्रे समवेत कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघातील शेकापच्या शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, त्या निमित्ताने आयोजित केलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आ. महेंद्र दळवी बोलत होते.

यावेळी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानावडे, विधानसभा संघटक सतिश पाटील, माजी शहर प्रमुख ॲड. सुशिल पाटील, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, विभाग संपर्क प्रमुख शैलेश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, तसेच विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.

राजमळा येथे रविवार (ता. 22) रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून घेतला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्षात राहून सतत अन्याय सहन करणारे अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून पुढील काही दिवसात ते सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेचा झंजावात जिल्हाभरात सुरु झाला असून शिवसेनेच्या जिगरबाज कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना शिवतीर्थावर भगवा फडकवणार असल्याची ग्वाही आ. महेंद्र दळवी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

यावेळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणारे तुषार शेरमकर यांनीही आपले मन मोकळे करुन शेकापमध्ये झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. आपण आ. महेंद्र दळवी, तालुका प्रमुख राजा केणी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावीत होऊन शिवसेनेत प्रवेश केला असून गरीब लोकांसाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले.

तालुका प्रमुख राजा केणी यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात शिवसेनेला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. शेकापचे खंदे कार्यकर्ते शिवसेनेत डेरेदाखल होत असल्याने शेकापची नेतेमंडळी दबावतंत्राचा वापर करु लागली आहेत. त्यांच्या दादागिरीला घाबरण्याची काहीही गरज नसुन, अशा नेत्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेत नव्याने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे शिवसेनेचे पाठबळ असेल, असा शब्द राजा केणी यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला.

कामगार नेते दीपक रानवडे यांनी जुने -नवे असा भेदभाव न करता सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत समान वागणुक दिली जात असून सर्वांचा चांगला सन्मान राखला जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी शहर प्रमुख ॲड. सुशिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी कुर्डुस मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.










Be First to Comment