Press "Enter" to skip to content

रस्त्याला बाधित ठरतयं रत्नराज हॉस्पिटलचे बेकायदेशीर बांधकाम

रत्नराज हॉस्पिटलच्या बेकायदेशीर बांधकामास कर्जत नगर परिषदेचे अभय !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

नुकत्याच झालेल्या कर्जत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामाविषयी जोरदार चर्चा होऊन कर्जतमधील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचे पालिकेच्या सभेत एकमत झाले . मात्र पालिकेच्या इमारतीच्या समोरच असलेल्या अनेक बेकायदेशीर बांधकामांना अभय दिल्याचे दिसून येत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पालिकेने अनधिकृत बांधकाम तोडण्याची सुरुवात डोळ्यासमोर असलेल्या बांधकामापासून करावी , अशी मागणी आता समोर आली आहे .
कर्जत नगर परिषदेच्या सर्व प्रभागात एम एम आर डी ए च्या निधीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटची रस्ते बनविण्याची कामे चालू आहेत . रस्त्यात बाधित होणारी बेकायदेशीर बांधकामे पालिका प्रशासन तोडत असताना कुणाच्या बांधकामावर कुऱ्हाड तर कुणाला अभय देऊन पालिका दुटप्पी भूमिका करत असल्याने नागरिकांत पालिकेच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे . विठ्ठलनगर परिसरात रत्नराज हॉस्पिटलची पत्र्याची शेड रस्त्याला बाधित असतानाही ती न हटविल्याने पालिकेवर संशयाची सुई फिरत आहे , यांत काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना ? अशी चर्चा येथे होत आहे .
कर्जत नगर परिषदेच्या कार्यालया समोर रत्नराज हॉस्पिटल आहे . हॉस्पिटलने बांधलेली पत्र्याची दहा फुटी शेड रस्त्यावर बांधली आहे . या विभागातील रस्त्याचे काम एम एम आर डी ए च्या निधीच्या माध्यमातून निघाले असताना ठेकेदाराने हे काम करताना रस्त्यात बाधित होणारे हॉस्पिटलची पत्र्याची शेड हटविण्याबाबत पालिका प्रशासनाला सांगून ती बेकायदेशीर शेड हटविल्यावरच रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे होते , मात्र ती बेकायदेशीर शेड तशीच ठेवून कमी अंतराचा रस्ता बनविण्यात आला आहे . तर त्याच्या समोरच्या दोन अनधिकृत टपऱ्या पालिकेने तोडल्या मात्र रत्नराज हॉस्पिटलला अभय दिल्याने नागरिकांत संताप खदखदत आहे . त्यातच कमी रुंदीचा रस्ता बनविल्याने भविष्यात वाहतुकीच्या समस्या परिसरात उद्भवू शकतात , असा नागरिकांचा आरोप असून कर्जत नगर परिषद कुणाच्या बांधकामावर हातोडा फिरवत आहे , तर कुणाला अभय देत असल्याच्या या संशयास्पद भूमिकेमुळे पालिकेवर संशयाची सुई फिरत असून यांत काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना , अशी जोरदार चर्चा परिसरात होत आहे .तरी पालिकेने विकास होण्याच्या दृष्टीने रस्त्याला बाधित होणारे रत्नराज हॉस्पिटलचे बेकायदेशीर शेडचे बांधकाम तोडावे , अशी मागणी विठ्ठलनगर परिसरातील नागरिक व बांधकाम तोडून ज्यांच्यावर कर्जतमध्ये अन्याय झाला आहे , असे नागरिक करत आहेत .त्यामुळे कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी या अनधिकृत शेडबाबत काय भूमिका घेतात , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.