रत्नागिरी येथे बदली : ग्रामस्थांसह पत्रकारांचे मानले आभार
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांची येथील ३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांना नागोठणे पोलीस ठाण्यात झालेल्या एका खास कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
नागोठण्यातील ग्रामस्थ, महिला दक्षता समिती, पोलीस ठाण्यातील कर्मचारी, विविध संस्था तसेच पत्रकार यांच्याकडून दादासाहेब घुटकडे यांना त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय पाली-सुधागड येथे बदली झालेले हे.काॅ. निलेश महाडिक यांनाही यावेळी उपस्थित सर्वांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व निरोप देण्यात आला.
दादासाहेब घुटूकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना नागोठण्यातील अनुभव कथन केले. १३ जून, २०१८ ला नागोठण्यात आलो तेव्हा येथील मुस्लीम बांधवांची मोठी संख्या असूनही येथील हिंदू-मुस्लीम बांधवांत असलेले ऐक्य, गावात व परिसरांत साजरे होणारे सर्व सण यामध्ये मिळणारे ग्रामस्थांचे सहकार्य याचा आवर्जून उल्लेख केला. सर्व कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार व महिला दक्षता समिती यांच्या सहकार्यामुळे नागोठण्यात माझे काम चांगले झाल्याचे मी समजतो. येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सर्वांचे असेच सहकार्य राहूद्या असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुजाता जवके, निलोफर पानसरे, राजश्री टके, सपोनि विजयकुमार देशमुख, नागोठणे ग्रा.पं. सदस्य अतुल काळे, सिराजभाई पानसरे, हुसेन पठान, वासिम बेडेरे, उमर सांगडे, मुजावर कडवेकर, विभागातील सर्व पोलीस पाटील आदींसह पत्रकार, नागोठणे पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार पी.एन. कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, घुटूकडे साहेबांनी पोलीस ठाण्यातील सर्वांना एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाढदिवस त्यांनी येथे साजरा केला. येथील सर्व नागरिक, पत्रकार यांच्यावरही त्यांनी तेवढेच प्रेम केले. माझ्या ३० वर्षांच्या सेवाकाळात असा अधिकारी मी पहिला नसून आपल्या प्रेमळ स्वभावाने ते नागोठणे पोलीस ठाण्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वांना आपलेसे करतील असे बोलून त्यांनी घुटूकडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या खुर्चीवर बसणारा अधिकारी बदली होवून जाणारच असतो. मात्र मी ज्यावेळी सरपंच झालो त्याचवेळी घुटूकडे साहेबांनीही नागोठण्याचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे अजून २ वर्षे ते येथे राहिले असते तरी मला आनंदच झाला असता असे बोलून कोरोन काळात घुटूकडे साहेबांनी सर्वोतोपरी सहकार्य केल्याचे धात्रक यांनी स्पष्ट केले.
याच कार्यक्रमात नागोठणे विभाग पत्रकार असो.चे अध्यक्ष अॅड. महेश पवार, निलोफर पानसरे, सपोनि विजयकुमार देशमुख, पोलीस कर्मचारी निलेश महाडिक, विनोद पाटील, संतोष म्हात्रे, दिनेश ढेणे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून दादासाहेब घुटूकडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment