कर्जत नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारास महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा संकल्प
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातुन व नगरसेवक संकेत भासे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकासकामांकरिता जवळपास 7 कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कामांमध्ये कर्जतच्या सौंदर्याच्या दृष्टीकोनातून काही विकासकामे होणार आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जत नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेश द्वाराकरिता 79 लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून सदर प्रवेशद्वार पूर्ण झाल्यानंतर त्यास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

त्याचा ठराव सुद्धा नगरपरिषदेने केला आहे. यात आदरणीय तीर्थरूप नानासाहेब यांनी केलेले कार्य व अप्पासाहेब, दादासाहेब करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे आणि कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य समजून मुख्य प्रवेशद्वारास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्या संदर्भातील निवेदन आज आमदार महेंद्र थोरवे यांनी आदरणीय सचिन दादा धर्माधिकारी यांची भेट घेऊन सादर केले व त्या प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे उपस्थित होते.








Be First to Comment