Press "Enter" to skip to content

रोहे तालुक्यातील गारभट खिंडीतील उतारावरील झाडे ठरत आहेत धोकादायक

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारभट खिंडीतील उतारावरील झाडे प्रवासाचे द्रुष्टीने सध्या धोकादायक ठरत आहेत.

गत वर्षी जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळ व त्यातूनच कोसळलेल्या मुसळधार स्वरूपातील पावसामुळे या खिंडीतील जेमतेम मातीचा आधार असलेली काही झाडेही कोसळली. सुदैवाने मुसळधार पाऊस पडत असल्याने कोणीही प्रवासी अथवा प्रवासी वाहन तेथून मार्गक्रमण करीत नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. तरी देखील अद्याप या खिंडीतील उतारावर काही झाडे कोणत्याही स्थितीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता सदरील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

विठ्ठलवाडी-गारभटचा परिसर जरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असला तरी या परिसरातील गावांची संख्याही फार मोठी आहे.त्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी आढळून येते. तसेच हा परिसर अतिदुर्गम,डोंगराळ व निसर्गरम्य परिसरात असल्याने व या भागात असणारे डॉक्टर फार्म व साई फार्म तसेच सुप्रसिद्ध असणारा ऐनवहाळ यामुळे बाहेरून येणा-या पर्यटकांची संख्याही मोठी आहे.तसेच नुकतेच चार दिवसापूर्वी गेल्या काही वर्षानंतर रोहा ते विठ्ठलवाडी लाल परीही धाऊ लागल्याने आता तरी संबंधित प्रशासन यंत्रणेने याकडे लक्ष पुरवावे तर गारभट खिंडीतील उतारावरील कोसळण्याच्या स्थितीत असणारी झाडे धोकादायक ठरत आहेत. तरी संबंधितांनी लवकरच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.