Press "Enter" to skip to content

‘प्लास्टिकचे ध्वज’ आणि ‘तिरंगा मास्क’ची विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलिबाग, नागोठणे, रोहा, कर्जत आणि कोलाड येथील पोलीस-प्रशासनाला दिलेल्या निवेदनांतून मागणी !

सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम |

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! देशाच्या स्वातंत्र्यदिनी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना पहावी लागते. यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. तरी अनुमती नसताना जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज किंवा तिरंगा मास्कची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच जी लोक, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीची निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलिबाग, नागोठणे, रोहा, कर्जत आणि कोलाड येथील पोलीस ठाण्यांत सादर करण्यात आली. तसेच ‘शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी’, ही मागणी करणारी निवेदने समितीच्या वतीने अलिबाग जिल्हाधिकारी, नागोठणे येथील नायब तहसीलदार आणि सरपंच यांनाही देण्यात आली.

‘राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे’. असेही समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली 20 वर्षे राबवत आहे. या अंतर्गत ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या विषयावर सध्याच्या घडीला ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि प्रश्‍नमंजुषा घेणे, सोशल मिडीया आदी माध्यमांतून प्रबोधन करणे, पडलेले राष्ट्रध्वज आढळल्यास ते गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणे आदी कृती केल्या जातात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांनी या राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले. त्यांच्या या बलीदानाचे स्मरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.

यावेळी चंद्रकांत लोखंडे, रोहातालुका उपशिवसेना प्रमुख,विजय बोरकर ग्राहक संरक्षण उपजिल्हा प्रमुख रायगड, ज्ञानेश्वर खामकरग्राहक संरक्षण पक्ष विभाक प्रमूख रोहा व पुई गाव शाखाप्रमुख,गणेश शिंदे कोलाड शाखाप्रमुख, संदीप मानेग्राहक संरक्षण विभाक शिवसेना, मोरेश्वर जाधव,कोलाड उप शाखाप्रमुख
दिनेश खराडे,हिंदू जनजागृती समिती उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.