आमदार महेंद्र थोरवे यांच्या मागणीला यश !
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणा संदर्भात ठोस उपाययोजनासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली होती , या बैठकीत दिवसेंदिवस कर्जत मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याकरीता कर्जत तालुक्याच्या नागरिकांसाठी एक स्वतंत्र कोविड रुग्णालय असावे , अशी मागणी आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी शासनाकडे केली होती.
याच मागणीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने कर्जत तालुक्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाकरिता रायगड हॉस्पिटल येथे ६० बेड च्या कोविड रुग्णालयासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही बाब कर्जतमधील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची असून त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकाला होणार आहे.
यातून कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांना पनवेल व मुंबई या ठिकाणी उपचाराकरिता जावे लागत होते. या पूढील कालावधीत उपचाराकरिता लोकांची होणारी धडपड थांबेल व आपल्याच परिसरात जवळच्या अंतरावर कोरोना आजाराच्या रुग्णांवर उपचार होतील.पुढील दोन ते तीन दिवसात सर्व नियोजनासहित हे कोविड रुग्णालय चालू होईल अशी माहिती कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी व तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या वतीने देण्यात आली आहे. सदर बाबतीत आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या बरोबरच सर्व पक्षीय प्रतिनिधींचे प्रयत्न सफल झाले आहेत .
Be First to Comment