वारसाला कामावर घेण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर यांचे प्रयत्न
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
सावळे रसायनी येथील चंद्रकांत गोमा म्हात्रे यांचे कोरोनाने फेब्रुवारी 2021 रोजी निधन झाल्याने कुटुंबातील कोणीच कमवता नसल्याने या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.अचानक कोरोनाने घाला घालून कुटूंबातून पालनपोषण करताच निघून गेल्याने म्हात्रे कुटुंब अडचणीत आले आहे.कै.चंद्रकांत म्हात्रे यांना पत्नी आणि चार वर्षांखालील दोन लहान मुले आहेत.सध्याची वाढती महागाई आणि रोजगार साधनही नसल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
कै.चंद्रकांत म्हात्रे हे रसायनीतील हिल इंडिया लिमिटेड कंपनीत कॅन्टीन विभागात काम करत होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला हिल इंडिया लिमिटेड कंपनीने रोजगार द्यावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत आहे.यासाठी सावळे गावचे आदीत्य गाताडे यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांची भेट घेऊन म्हात्रे कुटूंबाची हकिकत सांगितली.
सदरविषयी माजी आमदार मनोहर भोईर यांनी लागलीच हिल इंडिया लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाशी बैठक बोलावली.यावेळी हिल इंडिया कंपनीच्या चांभार्ली गेस्ट हाऊस येथील बैठकीत माजी आमदार मनोहर भोईर यांनी कंपनी युनिट प्रमुख डि.डि.सोनवाणी यांना कोरोना मयत चंद्रकांत म्हात्रे यांच्या पत्नीला कामावर घ्यावे अशी मागणी केली.
यावेळी सन 2016 पासून न्यायालयात हिल कॅन्टीन कामगारांचे प्रकरण सुरू असल्याचा मुद्दा कंपनी युनिट प्रमुख डि.डि.सोनवाणी यांनी पुढे केला.यावेळी माजी आमदारांनी चांगलेच धारेवर धरल्याने युनिट प्रमुखाची भंबेरी उडाली.यावेळी एचआयएल रसायनी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष सुनिल पाटील, खजिनदार राहुल जाधव,जाॅईंट सेक्रेटरी रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या चंद्रकांत गोमा म्हात्रे यांच्या पत्नीला कामावर न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही माजी आमदार मनोहर भोईर यांनी हिल इंडिया कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.याबाबत माजी आमदार मनोहर भोईर यांनी एचआयएल चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी पत्रव्यवहार कल्याचे समजते.








Be First to Comment