Press "Enter" to skip to content

करंजा द्रोणागिरी मंदिरासमोर मातीचे उत्खनन ; अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत

उत्खननामुळे प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या द्रोणागिरी मंदिराला धोका

सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |

करंजा गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या द्रोणागिरी मंदिराजवळ असलेल्या पूर्वनियोजित करंजा रेवस पुलासाठी भराव करण्यात आलेली माती काढण्याचे काम आज सुरू होते. माती उत्खनाचे फोटो व्हायरल होताच नेहमीच सुस्त असलेले उरणचे प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी घटनास्थळी जाऊन उत्खनन थांबविले आहे. परंतु सदरचे काम कोणाचे आहे व त्यासाठी कोणती परवानगी घेतली याची तपासणी करून नंतर कारवाई करू अशी माहिती चाणजे सर्कल संतोष जाभले यांनी दिली.

गेल्या वर्षी ही अशाच प्रकारे करोडो रुपयांची माती अनधिकृतपणे नेण्यात आल्याचे समजते. त्याबाबत अजून तरी कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आताही शासकीय यंत्रणा कारवाई करते का त्यांची पाठराखण करते तसेच करंजा रेवस पुलासाठी पाठपुरावा करणारे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी काय भूमिका घेतात याकडे करंजा ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

सन १९८२ रोजी केलेल्या करंजा रेवस पुलासाठी द्रोणागिरी मंदिराच्या पाठीमागे केलेला मातीचा भराव व त्या भरावासाठी वापरली गेलेली माती ही ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वताची व द्रोणागिरी मंदिराच्या पायथ्याची वापरली गेली होती. आज पुलासाठी केलेल्या भरावाची माती ही कोणालाही विश्वासात न घेता दुसऱ्या चालू असणाऱ्या कामासाठी वापरली जात असल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.

मातीचे उत्खनन होत असल्याने प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या द्रोणागिरी मंदिराला धोका पोचू शकतो असे येथील ग्रामस्थ सांगतात. याची माहित असूनही पुन्हा एकदा द्रोणागिरी मंदिराच्या पाठीमागे माती उत्खनाचे काम सुरू करण्याचे ठेकेदारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सदर माती उत्खनाचे फोटो व्हायरल होताच उरणमधील सुस्त असलेली शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर घटनास्थळी चाणजे सर्कल संतोष जाभले व तलाठी वी. सी. पाटील यांनी धाव घेत माती उत्खनाचे काम थांबविले आहे. यावेळी सर्कल जाभले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याची चौकशी करून पुढील कार्यवाही करू असे सांगितले आहे. गेल्या वर्षीही कोट्यवधी रुपयांची माती चोरून नेण्यात आली होती. त्यावेळी त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

त्यावेळीही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. तरीही पुन्हा मातीची चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत शासकीय यंत्रणा ठोस कारवाई करते की पुन्हा एकदा त्यांना मोकाट सोडून देते तसेच करंजा रेवस पुलासाठीची आग्रही असणारे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी या माती उत्खननाबाबत काय भूमिका घेतात याकडे करंजा ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.