धार्मिक विधीच्या ठिकाणावरच फोडल्या बाटल्या
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळच असलेल्या वेलशेत-आंबेघर गावांसाठी असलेल्या गणपती विसर्जन घाट व दशक्रिया विधीसाठी असलेल्या जागेवरच अज्ञात माथेफिरू मद्यपींकडून दारु व बियरच्या बाटल्या फोडुन धिंगाणा करण्यात आला आहे. सोमवार दि. ९ आॅगस्टच्या रात्री हा प्रकार घडल्याची शक्यता वेलशेत-आंबेघर ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत असून या प्रकाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागोठण्याहून पोयनाड, अलिबागकडे जाण्यासाठी असलेल्या अंबा नदीवरील पुलाखालीच वेलशेत बाजूकडे, वेलशेत-आंबेघर या गावांचे हे गणपती विसर्जन घाट आहे. तसेच याच ठिकाणी या दोन्ही गावांतील ग्रामस्थ दशक्रिया हे धार्मिक विधी करीत असतात. याशिवाय या दोन्ही गावांतील स्थानिक मच्छिमारही याच ठिकाणी अंबा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी येत असतात. मात्र याची कोणतीही पर्वा न करता मद्यपींनी याठिकाणी येऊन मद्यपान केले तर केले मात्र त्यापुढेही जाऊन रिकाम्या बाटल्या फोडून धिंगाणा घालण्याचे काम केले आहे.

त्यामुळे वेलशेत-आंबेघर या दोन्ही गावांतील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याशिवाय या फोडलेल्या बाटल्यांच्या काचांमुळे मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या स्थानिक मच्छिमार बांधवांना व शेतकऱ्यांना इजा होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे नागोठणे पोलिसांनी अधून-मधून याठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरु करावे अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून लवकरच नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रोशन पारंगे यांनी सांगितले.








Be First to Comment