अ.भा.जनवादी महिला संघटना,
डी.वाय.एफ.आय. व अ.भा.किसान सभा रायगड जिल्हा कमिटीच्यावतीने एल्गार
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
९ ऑगस्ट क्रांतीदिनी सीटू, अ.भा.जनवादी महीला संघटना, डी.वाय.एफ.आय. व अ.भा.किसान सभा रायगड जिल्हा कमिटीच्यावतीने उरण तहसिल कचेरीवर “मोदी हटाव देश बचाव”, “संविधान वाचवा, देश वाचवा” अशा घोषणा देत उरण चार फाटा ते तहसिल कार्यालय दरम्यान मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कामगार, महीला, शेतकरी, युवक आप आपल्या संघटनांचे झेंडे व मागण्यांचे फलक, बॅनर घेऊन सहभागी झाले होते.
उरण तहसिल कार्यालयावर मोर्चा पोहोचताच सर्व प्रथम दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या सुमारे ५५० शेतकरी हुतात्म्यांना, नुकताच झालेल्या पुर व दरडी कोसळल्याने मृत्यू मुखी पडलेल्या नागरीकांना श्रद्धांजली अर्पण केली.

उरण तहसील कार्यालया समोर झालेल्या सभेत केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा, शेतकरी व कामगार कायदे रद्द करा व वीज विधेयक मागे घ्या यासंबंधीची सविस्तर मांडणी सीटूचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील यांनी केली. महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील यांनी लसीकरण मोहीम, आरोग्य सुविधा, रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचार, गॅस, पेट्रोल, डीझेल, जीवनावश्यक वस्तूंच्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी गेल्या दिड वर्षात देशात निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला.
मोदींचे सरकार जनतेला दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले. त्यांनी राष्ट्रपतींना द्यावयाच्या निवेदनातील मागण्या मोर्चेकऱ्यांसमोर मांडल्या. त्याशिवाय उरण तालुक्यातील विविध समस्यांचा उहापोह केला व तोडगा काढण्यासाठी मा.उरण तहसिलदार यांना बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली. तर सीटूचे नेते शशी यादव यांनी केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत जनता विरोधी घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला.

मोदींचे सरकार हाकलून देऊ या. आपली एकजूट अधिक भक्कम उभारु या असे आवाहन केले. उरण तहसिलदार यांना निवेदन देण्यासाठी सीटूचे नेते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील,उषा म्हात्रे,गीता पाटील यांचे शिष्टमंडळ भेटले. त्यानंतर तहसिलदार यांचे सोबत झालेले चर्चेचे इतिवृत्त आंदोलकांना सांगितले कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे यांनी संबोधित केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.








Be First to Comment