Press "Enter" to skip to content

नागोठणे एस.टी. स्थानकाला आलेय तळ्याचे देखणे रूप ! अधिकाऱ्यांना स्थानकाचे वावडे ?

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती व महत्वाचे एस.टी. स्थानक असलेल्या नागोठणे स्थानकातील आवारात सध्या मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे सध्या पाण्याने भरल्याने नागोठणे स्थानकाला सध्या तळ्याचे देखणे रूप आले आहे. स्थानकात भले मोठे खड्डे पडूनही एस.टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने या अधिकाऱ्यांना नागोठणे स्थानकाचे वावडे आहे का ? तसेच नागोठणे स्थानकाला या खड्ड्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचे काम हे अधिकारी गणेशोत्सवापूर्वी तरी करतील का ? असे प्रश्न प्रवाशांतून विचारले जात आहेत.

नागोठणे स्थानकातील उखडलेल्या डांबरीकरणामुळे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच एक भला मोठा खड्डा सध्या पाण्याने भरला आहे. या खड्ड्याने संपूर्ण प्रवेशद्वार व्यापून काढले आहे. याशिवाय स्थानकाच्या आवारात पडलेले इतर लहान मोठ खड्डेही सध्या पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे एस.टी. गाड्या कुठे उभ्या कराव्यात हा प्रश्न चालकाला पडत आहे. तसेच एस.टी. मधून उतरणाऱ्या प्रवाशांनाही पाण्याने भरलेल्या खड्ड्यातूनच जावे लागत आहे. तसेच स्थानकात येणाऱ्या एस.टी. गाड्या वेगाने स्थानकात येत असतात.

त्यामुळे खड्ड्यात असलेले घाणीचे पाणी प्रवाशांवर उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच स्थानकात उरलेले मोठ मोठे दगड गोटे एस.टी. च्या टायर खालून उडून प्रवाशांना लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी एस.टी.च्या रामवाडी येथील विभागीय कार्यालयातील बांधकाम विभाग कडून नागोठणे स्थानकातील आवारात असलेले खड्डे भरण्याची योग्य ती उपाय योजना लवकरात करावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.