Press "Enter" to skip to content

वाढलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची झालेय चाळण !

वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचाच परिणाम म्हणून महामार्गावर खड्डे पडलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे याच खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. तरीही मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डयांचे विघ्न काही केल्या दुर झालेले नाही. मुंबई- गोवा महामार्गावरील नव्यानेच काम करण्यात आलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असुन अनेक ठिकाणी रस्त्याला तलावाचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणेच गणरायाच्या आगमनापुर्वी खड्डे भरण्याची परंपरा यावर्षीही कायम राहणार असल्याची परिस्थिती आहे. सध्याची महामार्गावरील रस्त्याची अवस्था पाहता गणपतीसाठी गावाला जाणा-या कोकणवासीयांचा प्रवास खड्डयांमधुनच करावा लागणार की काय अशी दयनीय अवस्था सध्या महामार्गाची झाली आहे. महामार्गावरील हे भयानक खड्डे मृत्युचे सापळे ठरत आहेत.

महामार्गावर ज्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्याठिकाणी वाहनांचा वेग कमी होत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय दुचाकीवरुन महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे दिव्यच. कारण कुठे खड्डा घात करेल याचा नेम नाही. महामार्गावरील खड्डयात आपटून तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. त्यामुळेच महामार्गावरील हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे वारंवार होणारे अपघात तसेच मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

महामार्गावरील खड्ड्यांबरोबरच काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावाला जाणा-या चाकरमान्यांना महामार्गावरुन प्रवास करतांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे यात तिळमात्र शंका नाही. वडखळ, नागोठणे, सुकेळी, कोलाड ते इंदापुर पर्यंत खड्डयांमधुन कसरतीचा प्रवास दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकणवासीयांचा चुकलेला नाही. महामार्ग हा फक्त म्हणण्यापुरताच ! पण इथे खड्डयांचा प्रवास काही संपता संपतच नाही. ३ ते ४ फुटांचे खड्डे सध्या महामार्गांवर पडलेले आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासांच्या प्रवासासाठी सध्या ७ ते ८ तास लागत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.