Press "Enter" to skip to content

९ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनी उपविभागीय कार्यालय येथे बेमुदत उपोषण

सारसई ते माडभूवन रस्त्यासाठी जि प सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली माडभुवन येथील सर्व आदिवासी ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा निर्धार

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी क्षेत्रातील सारसईं ते माडभुवन या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या परीसरातील वाड्यांना दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आपटा,मोहोपाडा बाजारपेठांत ये जा करत असताना डोंगरातून झाडा झुडपांची पायवाट असल्याने अनेकांना सर्पदंश झाल्याने काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.शिवाय रोजगार,शिक्षण तसेच इतर कामांसाठी या परीसरातील नागरिकांना दोन ते अडीच किलोमीटरचा डोंगर उतरून पुढील प्रवास करावा लागत आहे.

यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी या वनविभागाच्या परवानगीसाठी सतत पाठपुरावा केला आहे.जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला , जिल्हाधिकारी पासून तहसिलदार , तलाठी पर्यंत आणि जिल्हा उपसंरक्षक अधिका-यापासून ते वनपाल पर्यंत , जिल्हयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते गट विकास अधिकारी ग्रामसेवकापर्यंत या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात आणून देण्यासाठी अनेकदा बैठका , चर्चा निवेदने , धडक कृती कार्यक्रम करून झाले आहेत. परंतू अधिकारी वर्गाकडून या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही असा आरोप जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दशरथ घरत यांनी केला आहे.

या रस्त्याच्या वनविभागाच्या परवानगीसाठी ३/२ चा प्रस्ताव महत्वपुर्ण असते.आणि त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे वर उल्लेख केलेल्या अधिकारी वर्गाकडूनच दिली जातात . मग त्यासाठी एवढे वर्ष का लागतात ? याचा जाब विचारण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट २०२१ या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उपविभागीय कार्यालय पनवेल येथे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली माडभुवन येथील सर्व आदिवासी ग्रामस्थांनी घेतला आहे.जो पर्यंत वनविभागकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.