नवीन शेवा केंद्रातील प्राथमिक शिक्षकांकडून महाड मधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात कोकणातील अनेक जिल्ह्यासह रायगड मधील महाड तालुक्यात पूर येऊन नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले तर काहीकांचे संसार उध्वस्त होऊन होत्याचं नव्हतं झालं. अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले अनेक कुटुंब ह्या भयानक संकटा मुळे हतबल झाली. ह्या संकट समयी माझ्या … पूरग्रस्त समाज बांधवांना “मायेची साथ” आणि “मदतीचा हात” देण्याकरिता पुढे सरसावले ते ज्ञानरुपी समाज प्रबोधनाचं निर्मळ कार्य करणारे “ज्ञानगंगे चे भगीरथ”
उरण तालुक्यातील नवीन शेवा केंद्रातील सर्व प्राथमिक शिक्षक बंधू-भगिनीनी महाड मधील पूरग्रस्त बांधवाना ह्या संकट समयी एक मदतीचा हात म्हणून महाड तालुक्यातील वडवली वाडी, गोरीवले कोंड,-शीरवणे आणि शहरी भागातील ७२ पूरग्रस्त बाधित कुटुंबांना प्राथमिक गरजेपोटी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचं संच ( किट ) म्हणजेच चटई, बिसलरी पाणी बॉक्स, बेड शीट, टॉवेल, निरमा साबण, मोठे लाईफ बॉय साबण, मेणबत्ती,माचीस , बिस्कीट पाकिटं , मच्छर अगरबत्ती, बॅटरी टॉर्च सोबतच लहान चिमुकल्यांकरीता कॅडबरी चॉकलेट वाटप करून त्यांचं तोंड गोड करण्यात आले. तर ह्या भयानक परिस्थितीत सुद्धा शहरी आणि गावं खेड्यांत साफ सफाईचे कार्य करणारे स्वच्छता दूत, वायरमन, अग्निशमन दलातील कर्मचारी वर्ग यांना पाण्याचे बॉक्स आणि बिस्किट पाकिटं देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

माझ्या पूरग्रस्त माय- भगिनींकरिता मायेचं वस्त्र म्हणून नवीन साड्या आणि ब्लाऊज पीस केंद्रातील शिक्षक वि. रा.पाटील सर, म.का.म्हात्रे सर यांनी देऊन पुंण्याचं काम केलं. सोबतच ह्या पवित्र कार्यास आपुलकीची मदत देत आपल्या मोठ्या मनाचं औदार्य दाखवलं ते उरण तालुक्यातील नवीन शेवा केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनीं म.का.म्हात्रे सर, महेंद्र गावंड सर, वि. रा.पाटील सर, नरेश म्हात्रे सर, प्रतिभा पाटील मॅडम, शर्मिला गावंड मॅडम या सर्व शिक्षक बंधू भगिनीनी मदतीचा हात देत एक संदेश देखील दिला. तुम्हीं एकटे नाहीत खचून नका जाऊ ! संकटावर मात करून नव्यानं पुन्हा उभे राहू !! असं म्हणत अतिवृष्टी व पुरपरिस्थिती सोबत संघर्ष करून ताठ मानेनं उभ्या राहणाऱ्या माझ्या पूरग्रस्त महाडकर बांधवांचे नवीन शेवा केंद्रातील शिक्षक वर्गाच्या वतीनं मच्छिद्रनाथ म्हात्रे सर आणि विश्वनाथ पाटील सर यांनी विशेष कौतुक केलं.

सदर मदत योग्य त्या गरजू लाभार्थ्यां पर्यंत पोहचवीण्यासाठी आदरणीय डॉ. प्रभाकर गावंड महाड आणि कार्यरत शिक्षक सुरेश पाटील ( महाड)यांचे विशेष सहकार्य लाभलं. ह्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केलेल्या ह्या पवित्र कार्यातुन … मदत रुपी सहकार्यामुळे माझ्या पूरग्रस्त बांधवाना ह्या दुःखातून सावरण्याचं आणि पुन्हा नव्यानं उभं राहण्याचं नवं बळ मिळेल एवढं मात्र नक्की !








Be First to Comment