रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
सिटी बेल | अलिबाग |
रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे नवे कार्यालय अलिबाग तालुक्यातील मौजे चेंढरे येथे सुरू होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत मान्यतेचे आदेश समाज कल्याण आयुक्त कार्यालयास दिले आहे. त्यानुसार स.नं.76/2/ब/प्लॅट नं.09/घर क्र.1 1402अ, मौजे चेंढरे, ता. अलिबाग हा कार्यालयीन पत्ता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचा नवा पत्ता असेल.
आरक्षित जागांवर शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी तसेच आरक्षित जागांवरील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यामध्ये जिल्हानिहाय समिती गठीत करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, अलिबाग येथे नोव्हेंबर 2016 पासून कार्यरत आहे. स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार ही इमारत वापरासाठी अयोग्य ठरविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाचे स्थलांतरण करणे गरजेचे होते.
याबाबत माहिती देताना पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, या कार्यालयाचे कामकाज गतिमान व सुलभ सुरू होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या या समिती कार्यालयास तात्काळ कार्यालयीन जागा उपलब्ध करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री. धनंजय मुंडे यांना विनंती केली होती. त्यानुसार याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले व त्यानुसार हे कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यास मान्यता दिली.
याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आभार व्यक्त केले आहे.








Be First to Comment