महाड येथील पूरग्रस्त व तळीये येथील भूस्खलनग्रस्तांना पोस्को महाराष्ट्र स्टीलद्वारे खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याचे वाटप
सिटी बेल | माणगाव | अजित पाटील |
महाड येथे झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हाहा:कार माजवला. सततच्या मुसळधार पावसामुळे महाड व नजिकच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याची पातळी सहा फुटाच्यावर आली आहे.
महाड येथे पुराचे पाणी दुकाने, घरे तसेच अनेक फ्लॅट्सच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये शिरले आहे. अनेक लहान मोठी वाहने देखील या पुराच्या वाहनात बुडाले अथवा वाहून गेली आहेत. सातत्याने येत असलेल्या मुसळधार पावसाने येथील नागरिक त्यांच्या घरामध्ये तासन तास अडकले होते.

अशा कठीण परिस्थितीत पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली. पोस्को स्टील कंपनीद्वारे पूरग्रस्तांना २७५६ खाद्य पदार्थांचे पॅकेट्स, २००० बिस्किटे तसेच एक लिटर पाण्याच्या २००० बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पोस्कोद्वारे हे सर्व साहित्य महाड एमआयडीसी व माणगाव पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. हे साहित्य पोलीस व एमआयडीसीद्वारे पूरग्रस्तांना पुरविले जाईल.
याव्यतिरिक्त, तळीये येथे झालेल्या भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांना देखील कंपनीद्वारे ५०० खाद्य पदार्थांचे व व एक लिटरच्या ५०० पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कंपनीद्वारे सर्व साहित्याची वाहतूक करण्यासाठी दोन वाहने देखील माणगाव पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.कंपनीद्वारे त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत माणगाव येथील पूरग्रस्तांना व तळीये येथील भूस्खलन बधितांना मदत पुरवण्यात आली आहे.








Be First to Comment