जिपच्या कुर्डुस मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकणार :
तालुका प्रमुख राजा केणी यांचा निर्धार
सिटी बेल | याकुब सय्यद | अलिबाग |
तालुक्यातील कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र शेठ दळवी आणि तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घौडदौड सुरुच आहे. अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार मतदार संघातील सर्व शाखाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवसंपर्क अभियानांतर्गत हेमनगर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा एकमुखी निर्धार करण्यात आला.
या मेळाव्यास शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, पोयनाड विभाग प्रमुख योगेश जुईकर, कुर्डुस जिप मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश पाटील, उपविभाग प्रमुख महेश वावेकर, अरविंद पाटील, उपतालुका प्रमुख सुरेश घरत, डॉ. अविनाश पाटील, ज्येष्ट शिवसैनिक उत्तमशेठ पाटील, युवा संघटक महेंद्र पाटील, युवा सेनेचे अभिषेक पाटील यांच्यासह मतदार संघातील शाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.
येथील मतदारांनी अनेक वर्ष विकास होईल या अपेक्षेने शेतकरी कामगार पक्षाला मतदान केले आहे. परंतु पदरी निराशा आल्याने येथील मतदारांनी शिवसेनेला आपलेसे केले आहे. गाव तेथे शिवसेना शाखा आणि प्रत्येक घरात शिवसैनिक निर्माण करण्याचे ध्येय तालुका प्रमुख राजा केणी यांनी बालगले होते. त्याचबरोबर अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदार संघाच्या विकासासाठी रेवस-करंजा पुल, मेडिकल कॉलेज मंजूर केले आहेत. अनेक वर्ष शेकापचे वर्चस्व असलेल्या अलिबाग तालुक्यात आ. महेंद्र दळवी यांनी विकासाला वाट मोकळी केली आहे. याचमुळे शेकापच्या वर्चस्वाखाली घुसमट होत असलेल्या अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, शेकापचे निष्टावंत कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास तयार आहेत. पुढील काही दिवसात या सरपंचासह हजारो कार्यकर्ते शिवसेनेत जाहिर प्रवेश करतील असा दावा तालुका प्रमुख राजा केणी यांनी केला आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून येथील मतदारांनी शेकापची शिळी झालेली भाकरी करपवण्याचा एकमुखी निर्धार बुधवार (ता.21) रोजी हेमनगर येथील कै. जगन्नाथ केणी सभागृहात झालेल्या मेळाव्यात व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाच्या दुर्लक्षामुळे कुर्डुस मतदार संघाचा विकास रखडला आहे. येथील जनता रस्ते, आरोग्य, शुद्ध पाण्यासाठी भटकत असताना शेकापचे सदस्य मात्र राजकारण करण्यात गुंतले आहेत. कोरोना कालावधीत शेकापचे सदस्य, नेतेमंडळी या मतदार संघात फिरकलीच नाहीत, यामुळे मतदारांमध्ये तीव्र असंतोष परसला आहे. याच दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी कोरोना कालावधीत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्या उपचारासाठी सहकार्य केले, कोरोना साथ आटोक्यात यावी म्हणून निर्जंतुकीकरण, मास्क वाटप, ट्रक भरुन अन्नधान्याचे वाटप केले. याचमुळे शिवसेनाचा जनाधार वाढला आहे. शिवसंपर्क अभियांतर्गत शिवसेनेचे कार्यकर्ते सामान्य नागरिकांशी संपर्क साधत आहेत. या संपर्का दरम्यान शेकापच्या नाकर्तेपणावर नाराज असलेल्या मतदारांनी शेकापच्या नेतेमंडळींना चांगलेच खडेबोल ऐकवले असून कुर्डुस मतदार संघातून हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.








Be First to Comment