Press "Enter" to skip to content

बकरी ईद निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने राष्ट्र सेवा दल व हुसेनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने व राष्ट्र सेवा दल, हुसेनी फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान हे सर्व जाती धर्मापलीकडे माणसाला माणसाशी जोडते. रक्तदान करुन बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी घराबाहेर पडून रक्तदान केले.

बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय देत रक्तदान करुन साजरी करण्याचा मानवतावादी दृष्टिकोन आनंद देणारा आहे असे मत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्र कार्यवाह अल्लाउद्दीन शेख यांनी यावेळी मांडले. युसूफ मेहेरअली सेंटर ताराचे संतोष ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रक्तदान केले. महाराष्ट्र अंनिस रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी मनोहर तांडेल, प्रभाकर नाईक आणि ईतर कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केलं.

महाराष्ट्र अंनिस पनवेल, राष्ट्र सेवा दल, हुसेनी फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाला जादुटोणा विरोधी कायदा पत्रिका देण्यात आली. तसेच सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे असे महाराष्ट्र अंनिस पनवेल शाखेच्या वैभव शिंदे यांनी म्हटले. सदर उपक्रम रोटरी ब्लड बॅंकेच्या सहकार्याने घेण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.