Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे पुन्हा शिवसेनेत

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली परतले स्वगृही

सिटी बेल | याकुब सय्यद | अलिबाग |

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून शिवसेनेने सुरु केलेल्या ‘शिवसंपर्क अभियानात रायगडमधून शिवसेनेच्या गळाला पहिला मासा लागला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्रशेठ दळवी, शिवसेना उप जिल्हा प्रमुख नरेश गावंड, शिवसेना पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या उपस्थितीत जांभळे यांनी मंगळवार (ता.20) रोजी पक्ष प्रवेश केला.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय जांभळे यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिक म्हणून काम करताना पक्षश्रेष्टी जी जबाबदारी देतील ती संभाळणार आहे.

संजय जांभळे व त्यांची पत्नी हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येऊन रायगड जिल्हा परिषदेमध्ये 2007 पासून अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्यावर अर्थ आणि बांधकाम सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अडीच वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे रविशेठ पाटील यांना पेण विधानसभा मतदार संघातून निवडणुक जिंकणे सोपे झाले होते. आता पुन्हा भाजपामधून बाहेर पडत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधून घेतले आहे.

त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पेण तालुक्यातील शिवसेनेच्या पक्षबांधणीस बळकटी येणार आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डोलवी औद्योगिक वसाहत, आदानी सिमेंट टर्मिनल्स मध्ये सक्षमपणे बाजू मांडता येणार असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.