सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण अलिबाग विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. विशेष म्हणजे आज १५ जुलै हा त्यांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप टाकून आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या जाण्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे. ते पप्पा या नावाने ओळखले जात होते.
माजी आमदार मधुकर ठाकूर यांना प्रकृती साथ देत नसल्याने ते ३ ते ४ वर्षांपासून ते आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि ३००४ ते २००९ या काळात उरण अलिबाग मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
काल पासून त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात व वर्तमानपत्रात त्यांच्या वाढदिवस शुभेच्छाचे बॅनर व जाहिराती झळकल्या होत्या. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. वाढदिवसाच्या दिवशीच पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचाराची साथ सोडली नाही. जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असायचे. अलिबाग व परिसरात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यामुळे काँग्रेसची कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. असे उरणमधील अनेकांनी शोक व्यक्त करताना सांगितले.
त्यांच्या पार्थिवावर अलिबाग तालुक्यातील सातिर्जे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या जाण्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment