Press "Enter" to skip to content

वणी ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे आ.अनिकेत तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

विकासकामांच्या लोकार्पणामुळे साहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी : आ. अनिकेत तटकरे



सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

वणी गावाने तटकरे साहेबांना मागील लोकसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने भरभरून प्रेम दिल्याने येथे घडल्याचा मोठा गजर ऐकायला मिळाला. तटकरे साहेब, पालकमंत्री आदितीताई व मी आम्ही तिघांनीही या गावाला, विभागाला विकासाच्या बाबतीत नेहमीच झुकते माप दिले आहे. विकासकामे करतांना नेहमीच अडचणी येत असतात, मात्र तटकरे साहेबांनी शब्द दिला म्हणजे ते काम उशीर झाले तरी पूर्ण होणारच याची खात्री आपल्याला असते. साहेबांनी नेहमीच वाड्या-वस्त्यांवरील समस्या समजून घेवून, त्या सोडवून त्यांची राजकीय वाटचाल केली. वणी ग्रामपंचायतीमध्येही आदिवासी वाड्यांचा समावेश असल्याने येथील चार कामांचे लोकार्पण व तीन कामांचे भूमिपूजन आज होत आहे. भूमिपूजन झालेली कामेही लवकरच पूर्ण करून त्यांचेही लोकार्पण होणार असल्याने वणीच्या विकास कामांतील नळ पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांच्या घरोघरी पाणी पोचणार असल्याने एक पुण्याचे काम झाले आहे. त्यामुळे आजच्या या लोकार्पणामुळे साहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी झाल्याचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी सांगितले.

खा. सुनील तटकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या लोकार्पण व भूमीपूजनानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, कोंडगावचे माजी सरपंच कृष्णा धामणे, ह.भ.प. विठोबा महाराज मांडलुस्कर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, कार्यकारिणी सदस्य सचिन कळसकर, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, दिलीप आवाद, वणी सरपंच सौ. प्रगती दीपेंद्र आवाद, उपसरपंच महेंद्र हंबीर, युवक राष्ट्रवादीचे युवा नेते राकेश शिंदे, जिल्हा सचिव विनायक गोळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा अमिता शिंदे, युवा नेते दीपेंद्र आवाद, मंगेश तेरडे, प्रकाश मोरे, सुनील लाड, नागोठणे विभाग युवक अध्यक्ष निवास पवार, अविनाश मांडलुस्कर, निवृत्ती मांडलुस्कर, सदानंद हंबीर, वणी ग्रा.पं. सदस्य हेमंत पारधी, संतोष रेवाळे, निखील धसाडे, सौ. दीपिका दीपक वनकर, सौ. क्रीतीका किशोर मांडलुस्कर, सौ. कमळ भिवा निरगुडे, सौ. मालती हशा हंबीर, सौ. शेवंता सुरेश पारधी, ग्रामसेविका सौ. नीलिमा म्हात्रे, विक्रांत घासे, किसन बोरकर, प्रमोद जांबेकर, अमित जांबेकर, दिनेश घाग, मनोज टके, अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, कुणाला तेरडे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व वणी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी ग्रामपंचायती मधील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत वणी येथील नळ पाणीपुरवठा योजना, राजिपच्या वार्षिक योजनेतून गोयंडावाडी येथील अंगणवाडी, सुप्रीम पेट्रोकेम लि. यांच्या सहकार्याने चेराठी व वणी येथील शौचालय बांधणे या चार कामांचे लोकार्पण तर आमदार निधीतून वणी येथील बस थांबा, राजिपच्या वार्षिक योजनेतून वणी येथील नदी किनारी संरक्षण भिंत बांधणे व ढेपावाडी रस्त्याला साकव बांधणे या तीन कामांचे भूमिपूजन आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

वणीच्या सरपंच प्रगती आवाद आपल्या मनोगतात म्हणाल्या की, वणी ग्रामपंचायतीमध्ये खासदार तटकरे साहेब, पालकमंत्री आदितीताई व आमदार अनिकेतभाई यांच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक विकासकामे झाली आहेत. तटकरे साहेबांचे विकास कामांसाठी नेहमीच सहकार्य असते.त्यांच्याकडे कधी गेलो तर रिकाम्या हाती आलोत असे कधी झालेले नाही. त्यामुळे तटकरे कुटुंबियांचे वणी ग्रामपंचायतीला नेहमीच मोलाचे सहकार्य असल्याचे प्रगती आवाद यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते दीपेंद्र आवाद यांनी तटकरे कुटुंबियांनी वणी गावासाठी आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या कार्याचा गौरव केला. दरम्यान यावेळी त्यांनी गावात सभागृहासाठी निधी देण्याची मागणीही आ. अनिकेतभाई तटकरे यांनी मान्य केल्याने व पुढील आषाढीच्या आत हे काम पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिल्याने वणी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतांना उपसरपंच महेंद्र हंबीर यांनी खा. तटकरे साहेब, पालकमंत्री ना. आदितीताई व आमदार अनिकेतभाई यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल वणी ग्रामपंचायत व वाड्यांवरील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.