शासनाच्या नियमांच्या पालनासह पर्यटकांची माथेरानला पसंती
सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |
नुकताच २६ जून पासून माथेरान मध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यावर शासनाच्या नियमांचे पालन करत मास्क परिधान करून पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.
गावात अंतर्गत पॉईंट्स फिरण्यासाठी अस्तित्वात असणारी वाहतूक व्यवस्था वगळता इथे राहण्याची व्यवस्था ही खूपच स्वस्त असल्याने अनेकजण एक दिवसीय पॉईंट्सचे पर्यटन करून मुक्काम करीत आहेत.दोन महिने लॉक डाऊनच्या खडतर वाटचाली मधून पर्यटकांना प्रवेश दिल्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.मिनिट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यात सुध्दा वाढ करण्यात आली आहे त्यामुळे अमन लॉज रेल्वे स्टेशन वरून गावात येण्यासाठी अगदी स्वस्त दरात प्रवासाची सोय उपलब्ध आहे त्यामुळे शनिवारी आणि रविवारी इथे मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुध्दा कोव्हीडचे नियम पाळत आहेत. मास्क परिधान करूनच इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने सुध्दा विना मास्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे.तर नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाकडून सुध्दा येणाऱ्या पर्यटकांना नियमांचे पालन करण्याबाबतीत जनजागृती साठी दवंडी दिली जात आहे.विना मास्क आढळून आल्यास ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, स्टॉल धारक,हातरीक्षा चालक, अश्वपाल सुध्दा नियमाने वागत आहेत. इथे कोरोना रुग्णांच्या संख्येचे प्रमाण सुध्दा नगण्य आहे.
माथेरानचे संपूर्ण जनजीवन हे केवळ पर्यटनावर अवलंबून आहे त्यामुळे निदान या स्थळासाठी अन येणाऱ्या पर्यटकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी सात ते सांयकाळी आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी व्यापारी वर्गासह स्थानिकांमधून होत आहे.
लॉक डाऊन नंतर विशेष बाब म्हणून माथेरानला अनलॉकची सूट मिळाली आहे. आणि अनायास जिल्हाधिकारी आपल्या माथेरानला आल्या त्यातून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असता त्यांनी माथेरान व्यवसायिक यांना शनिवार व रविवारची दुकान उघडे ठेवायची सूट दिली आहे.माथेरानकराना जर दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्याची मुभा मिळाली तर ग्राहकांना आकर्षित करून आपल्या व्यवसायाला चालना देता येईल व गर्दी न करता प्रत्येक ग्राहकाला माल देता येईल.
ज्ञानेश्वर बागडे —
व्यावसायिक माथेरान








Be First to Comment