आर्थिक फायद्यासाठी कंत्राटदाराचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
सिटी बेल | श्रीवर्धन | समीर बामुगडे |
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली आदर्श सांसद गावातील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेला १४ वर्ग खोल्यांची भव्य इमारतीकरिता खासदार सुनील तटकरे यांनी सीआरएस फंडातून सुमारे १ कोटीचे काम मंजूर केले आहे. सदर इमारतीचे फाउंडेशन काम चालू आहे.मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
तालुकाध्यक्ष सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार वडवली येथील मनसे विभाग अध्यक्ष किशोर बिराडी, श्रीवर्धन तालुका सचिव सुमित सावंत आणि वडवली गावातील मनसे सैनिक यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता या ज्योत्याचे दगडी बांधकामाला जो सिमेंट माल वापरला आहे तो पुर्णतः निकृष्ट दर्जाचा वापरला आहे. सिमेंट युक्त मालाचा अत्यंत कमी वापर करून फक्त दगड एकमेकांवर रचून हे बांधकाम करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

एक मजली इमारत जर अश्या कच्च्या मालावर उभी रहाणार असेल तर भविष्यात येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीविताला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार केवळ ठेकेदार आणि काम करणारे सबकाँट्रॅक्टर यांनाच धरण्यात येईल. यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे तसेच हे काम ज्या गव्हरमेंट रजि.काॅन्ट्रकरने घेतले आहे ते निष्क्रीय व कामचूकारपणा करत असल्याबाबत त्या संस्थेला अथवा ठेकेदाराला ब्लकलिस्ट मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

त्या इमारतीच्या जोत्याचे निकृष्ट दर्जाचे काम आहे हे प्रत्येक्षात जागेवर जाऊन पहाणी व खात्री करुनच पुराव्यासह (सोबत व्हिडीओ क्लिप करुन घेतली आहे)तर ते काम निस्कृष्ठ दर्जाचा सिद्ध होत आहे. हे पाडून पुन्हा त्या ठिकाणी नव्याने गुणवत्ता पूर्ण टिकाऊ बांधकाम करायला हवे. या सर्व बाबींवर मनसे सैनिकांनी संताप व्यक्त केला आहे व भविष्यात जर ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांनी आपल्या कामाची पद्धत बदलली नाही तर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी ठेकेदार, शासकीय अभियंता, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची एकत्रीत बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये या संपर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल.असे तेथील मनसे तालुका अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment