Press "Enter" to skip to content

साप्ताहिक बुलंद रायगड चे आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन

नागोठणे, रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील जनतेसाठी लढा – पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे


सिटी बेल | नागोठणे |

मी माझ्या जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या व आता मंत्रिपदाच्या कार्यकाळात साप्ताहिकात व वृत्तपत्रात काम करणारे पत्रकार जवळून पहिले आहेत. पत्रकारांच्या लेखणीत तलवारीपेक्षा धार असते. ही ताकद जोपासणे लोकांपर्यंत पोहचवणे हे काम कठीण आहे परंतु काही पत्रकार मंडळी हे काम निर्भीडपणे करीत आहेत. त्यातीलच साप्ताहिक ” बुलंद रायगड ” चे संपादक शामकांत नेरपगार व कायदेशीर सल्लागार ऍड. महेश पवार हे नागोठण्यातील दोन पत्रकार आहेत. सध्याच्या परिस्थितीत साप्ताहिक असो वा वर्तमानपत्र असो नव्याने सुरु करणे अशक्यप्राय आहे. कष्ट करण्याची ताकद व जिद्द असेल तर हेही शक्य होते. साप्ताहिक ” बुलंद रायगड ” ने नागोठणे, रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्या अडचणी प्रखरपणे मांडून लढा दिला पाहिजे. खासदार तटकरे साहेब, आमदार अनिकेतभाई व माझे साप्ताहिक “बुलंद रायगड ” ला सर्वोतोपरी सहकार्य राहील असे अभिवचन रायगडजिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी दिले.

सुतारवाडी येथील गीताबाग येथे रायगड लोकसभा मतदार संघांचे कर्तव्यदक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सुनिल तटकरे साहेब वाढदिवस विशेषांक असलेल्या साप्ताहिक ‘ बुलंद रायगड ” च्या प्रथम अंकाचे प्रकाशन रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी रोहा पं. स. चे माजी सभापती जेष्ठ नेते मोतीरामशेठ (आप्पा ) तेलंगे, नागोठणे विभागीय नेते भाईसाहेब टके, रोहा पं. स. चे माजी सभापती सदानंद गायकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जेष्ठ नेते मधुकर ठमके, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, साप्ताहिक “बुलंद रायगड ” चे संपादक शामकांत नेरपगार, कायदेशीर सल्लागार ऍड. महेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, नागोठणे प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, युवक राष्ट्रवादी रोहा तालुका अध्यक्ष जयवंत मुंढे, पिगोंडे सरपंच संतोष कोळी, पाटणसई ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर , नागोठणे ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक रोहा तालुका अध्यक्ष पप्पूशेठ अधिकारी, युवक राष्ट्रवादी नागोठणे विभागीय अध्यक्ष निवास पवार, युवक राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग, वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जांबेकर, मनोज टके, अमित जांबेकर, रोहिदास हातनोलकर, राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, गुड्डू मोदी, प्रथमेश काळे, सिद्देश काळे, विहान हेंडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे उपस्थितांना संबोधित करताना पुढे म्हणाल्या की लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले तर पत्रकार त्यांचे कौतुक देखील करतात परंतु कधी कधी पत्रकार त्याच्यावर टीका देखील करतात. परंतु ही टीका लोकप्रधिनींनी सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे. या टीकेमुळे काम लोकप्रतिनिधींना काम करण्याची उर्मी मिळते. मी व भाई कामात कुठे कमी पडत असतील तर तेही साप्ताहिक “बुलंद रायगड ” ने प्रखरपणे मांडावे त्यामुळे आम्हाला काम करण्याची दिशा निश्चित मिळेल. तसेच आजच्या काळात सर्व बातम्या आगोदरच व्हाट्स अॅपच्या माध्यमातून पाहावयास मिळतात त्यामुळे आजचे युवक वृत्तपत्र वाचत नाहीत. परंतु युवकांनी सुद्धा वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. वृत्तपत्र वाचल्यामुळे विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होते.

खासदार तटकरे साहेब सकाळी उठल्यानंतर प्रथम वृत्तपत्राचे वाचन करतातच त्यांच्यामुळे आम्हालाही सकाळीच वृत्तपत्र वाचन करण्याची सवय जडलेली आहे. असे सांगून आदितीताई पुढे म्हणाल्या की साप्ताहिक ” बुलंद रायगड ” ची वाटचाल बुलंद चालली पाहिजे आणि वाटचाल बुलंदच चालणार असा विश्वास शेवटी ना. आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला.

आमदार अनिकेतभाई तटकरे आपल्या मनोगतात म्हणाले की, नागोठणेचे पत्रकार आबा नेरपगार व ऍड. महेश पवार हे गेले 20 ते 25 वर्ष विविध वृत्तपत्रात लिखाण करीत असून त्यांनी आपल्या लिखाणातून जसनसामान्याच्या विविध समस्या व अडचणी प्रखरपणे मांडलेल्या आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभवाचा उपयोग करून साप्ताहिक ” बुलंद रायगड ” चा प्रारंभ करून धाडसी पाऊल उचललेले आहे. आमचे या पत्रकारांना पूर्णपणे सहकार्य असेल. तसेच प्रत्येक आठवड्याला हे साप्ताहिक गीतबागला वाचायला मिळेल तसेच धारदार लेखणीच्या बळावर जनतेपर्यंत वाचले जावे अशी अपेक्षा अशी अपेक्षा आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त केली.

साप्ताहिक बुलंद रायगडच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बुलंद रायगड परिवारातर्फे प्रस्ताविक सादर करतांना बुलंद रायगडचे कायदेशीर सल्लागार, पत्रकार अॅड. महेश पवार म्हणाले की, गेले अनेक वर्षे आम्ही जरी वेगवेगळ्या दैनिकांचे वार्ताहर म्हणून वार्तांकन करीत असलो तरी आपले स्वतःचे असे एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी रायगचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सहकार्याने सुरु होत असलेल्या या साप्ताहिकाचा पहिला अंकही खा. तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस विशेषांक म्हणून प्रसिद्ध होत असतांनाच वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या अंकाचे प्रकाशन रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याचा आम्हाला आनंद आहे.

या अंकाची तयारी सुरू असतांनाच आमचे सहकारी व या साप्ताहिकाचे संपादक शामकांत नेरपगार कोविड संसर्गामुळे अलिबाग जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्याने अंकाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आलेली असतांना जाहिरातदारांनी अल्पावधीत दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा अंक आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण करुन आपल्यापर्यंत पोहचवू शकलो. त्यामुळे या सर्व जाहिरातदारांचे मी आभार मानतो. कोविडवर यशस्वीपणे मात करुन शामकांत नेरपगार आज प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आहेत.

भविष्यात हे साप्ताहिक वैविध्यपूर्ण व वस्तुनिष्ठ बातम्यांसह नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि रोखठोक भूमिकेतुन आपल्या सेवेत दर आठवड्याला प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे बोलून आपल्या व्यस्त कार्याक्रमातून या साप्ताहिक बुलंद रायगडच्या खा. सुनिल तटकरे साहेब वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन केल्याबद्दल ना. आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यासह नागोठण्यासह रोहा तालुक्यातून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे अॅड. महेश पवार यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.