Press "Enter" to skip to content

कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयात वृक्षारोपण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी उच्चशिक्षण मंत्री प्र. ना. तथा अप्पासाहेब धारकर यांच्या 92 व्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण केले. गेली 13 वर्षे हा उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

अप्पासाहेब धारकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, कुबेर इंटिरियरचे महेश कोकाटे, प्रा. प्रीतम जुवाटकर, कार्यालयीन अधीक्षक शिवराम पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. जुवाटकर यांनी, ‘आतापर्यंत आपण महाविद्यालयाच्या परिसरात सुमारे अडीच हजार झाडे लावली असून त्यापैकी 90 टक्के झाडांचे आपण चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नक्षत्र गार्डन मध्ये 23 नक्षत्रांची झाडे असून वृद्राक्षाचे झाडही आपण वाढवले आहे. यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य असावे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. मोहन काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शृंगारपुरे यांनी, ‘अप्पासाहेबांचे व्हिजन आपण पूर्ण करीत आहोत. त्यांनी कर्जतमध्ये उच्चशिक्षणाची सुविधा आणल्याने या तालुक्याचा सर्वच क्षेत्रात विकास झाला आहे.’ असे स्पष्ट केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.