Press "Enter" to skip to content

राणाप्रताप मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांचे रक्तदान

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

मोठे वेणगाव मधील राणाप्रताप मित्र मंडळाच्या वतीने आपला एक अकस्मात गेलेला सहकारी स्व. प्रितेश शिंदे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांचे सहकार्य लाभले होते. या शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान अरुण आदरांजली वाहिली. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी संयोजित कर्जत – खालापूर तालुक्यातील हे 432 वे शिबीर होते.

मोठे वेणगाव मधील विठ्ठल मंदिराच्या सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घरे, सरपंच अभिषेक गायकर, श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार, भाजपा जिल्हा सर चिटणीस रमेश मुंढे, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, उपसरपंच गणेश मुंढे, डॉ. प्रीती करवंदे, उद्योजक गणेश मुंढे, संतोष पालकर, अभियंता अजय चव्हाण, हरिश्चंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, अरुण भोर यांनी, ‘मी परवाच लोकमतच्या रक्तदान शिबिरात अलिबागला रक्तदान केले. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना रक्त वेळेवर मिळत नाही. तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. तुमचे राणाप्रताप मित्र मंडळ सातत्याने रक्तदान शिबिर भरवून एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’ असे स्पष्ट केले. रमेश मुंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

गणेश मुरकुटे या युवकाने सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे लोकमतचे जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी 64 वर्षांच्या पदार्पणात आपले 66 वेळचे रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडले. रक्त संकलनाचे काम समर्पण रक्तपेढी घटकोपरच्या डॉ. आकलाख शेख, निरीक्षक प्रकाश एवाळे, लता देशक, प्रदीप निनोरे, शिला वाघमारे, स्नेहल कांबळे आदींनी केले. राणाप्रताप मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.