दारूबंदी खाते व पोलिसांचे दुर्लक्ष ?
संबधित दारु अड्ड्यांवर कारवाई करणार : अधिक्षक किर्ती शेडगे
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार|
नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीत येणा-या सुकेळी तसेच ऐनघर विभागामधील आदिवासी वाडी परिसरातील जंगलात गावठी दारुची निर्मिती व गावठी दारुचे अवैध धंदे तेजीत सुरु आहेत. याच गावठी दारुची पार्सल सेवाही या भागात अनेक ठिकाणी सुरु असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. असे असतांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारूबंदी खाते व पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या आधीही ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील खैरवाडी तसेच वाघ्रणवाडी जंगलातील गावठी दारुची निर्मिती करण्याच्या ठिकाणावर जाऊन ते अड्डे तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत नागोठणे पोलिस व ग्रामस्थांकडून उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस विभागामध्ये गावठी दारुच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले होते. पंरतु सद्य परिस्थितीत या ऐनघर विभागामध्ये गावठी दारुची विक्री ही तेजीत सुरू असुन देशी- विदेशी दारुची नियमबाह्य चोराटी विक्रीही ऐनघर, सुकेळी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याचप्रमाणे या विभागाध्ये दिवसाढवळ्या देखील मोठ्या प्रमाणात गावठी दारुची पार्सल अनेक ठिकाणी पोहोच केली जात आहेत. याच गावठी दारुमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. काहींना तर आपल्या जीवालाही मुकावे लागले आहे. असे असतांनाच ऐनघर विभागात पुन्हा एकदा गावठी दारुची विक्री जोरदार सुरू झाल्यामुळे महिला वर्गांमध्ये निराशजनक वातावरण निर्माण झाले आहे.
नागोठणे परिसरातील गावठी दारु निर्मितीच्या अड्ड्यांवर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत केवळ नवसार मिश्रित बेवारस रसायन भरलेले ड्रम वगैरे माल नष्ट करण्यात येत आहे. मात्र सदर दारुनिर्मिती अड्डे चालविणारे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागोठणे विभागात हे अवैध गावठी दारूचे धंदे वारंवार बंद करूनही पुन्हा ते नव्या जोमाने सुरु होत आहेत. त्यामुळे या अवैध गावठी दारु अड्डवाले व विक्रेत्यांना नक्की कुणाचा आशीर्वाद आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
त्यामुळेच दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या अवैध गावठी दारु निर्मितीच्या अड्ड्यांवर व गावठी दारू धंद्यावर तसेच चोराटी व पार्सल पद्धतीने सुरु असलेल्या देशी – विदेशी दारुची विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क खाते व पोलिसांनी लवकरात लवकर तसेच ठोस कारवाई करुन गावठी दारुविक्री समूळ नष्ट करावी अशी मागणी या विभागातील महिलावर्गांकडुन होत आहे.
दरम्यान यासंदर्भात उत्पादन शुल्क खात्याच्या रायगड जिल्हा अधिक्षक कीर्ती शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ऐनघर विभागातील गावठी दारु निर्मितीच्या अड्ड्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी आमच्या रोहा-मुरुड विभागाच्या अधिका-यांना लगेचच आदेश काढून कारवाई करण्यास सांगितले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाव्य कारवाईकडे ऐनघर विभागातील महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.







Be First to Comment