कडसुरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार व योजनेतील पैशांचा अपहार प्रकरणी योजनेचे अध्यक्ष असलेल्या व संबधित विद्यमान सरपंचांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन सरपंच पदावरून काढण्यासाठी कडसुरे ग्रामस्थांकडून रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण राजिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्याकडून मिळालेल्या संबंधितावर कारवाई करण्याच्या लेखी आश्वासना नंतर कडसुरे ग्रामस्थांकडून स्थगित करण्यात आले आहे.
मात्र त्याचवेळी जर याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर येत्या काही दिवसांत विनाविलंब कारवाई करण्यात आली नाही किंवा कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली तर पुन्हा नव्या जोमाने अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असेही कडसुरेतील उपोषणकर्ते ग्रामस्थ महेश शिंदे, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, संदीप शिंदे, दत्तात्रेय शिर्के व काशीराम गव्हंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी राजिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्याकडून कडसुरे ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कडसुरेच्या पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच यांचे विरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार पुढील कारवाई करण्याबाबत कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे राजिप कार्यालयातून जा.क्र. १३३०९ दि. २४/०६/२०२१ अन्वये अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून पुढील आदेश प्राप्त होताच कडसुरे ग्रामपंचायतीच्या संबधित सरपंच यांचे विरूध्द नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी संबधितावर कधी व कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण नागोठणे विभागाचे लक्ष लागले आहे.







Be First to Comment