नागोठण्यातील तरुणाई राष्ट्रवादी पक्षात येणे ही मोठी गोष्ट आहे : खा. सुनील तटकरे
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राज्यात वेगळे समीकरण जुळविण्याची किमया या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी केली. नंतर सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदिती तटकरे यांना मिळाली. त्यामुळेच कोरोना काळातही सर्वत्र आर्थिक परिस्थिती खालावली असतांना जिल्ह्यात विलासाचा वेग राखण्यात यश आले. जिल्ह्यात नागोठणे हे मध्यवर्ती शहर आहे. या शहराला राजकीय, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आहे. याच शहरातील उच्चशिक्षित तरुणाई पक्षात येणे ही मोठी गोष्ट आहे. कारण तरुणाईच पक्षाला बळकटी देण्याचे काम करीत असते असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
सुतारवाडीतील “गीता बाग” येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी(दि.२७) सकाळी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
नागोठण्यातील तरुण कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमास आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, हरिषशेठ काळे, शंकरराव भगत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन कळसकर, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव विनायक गोळे, मंगेश तेरडे, दिलीप आवाद, रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटपोढे, राष्ट्रवादी महिला आघाडी रोहा तालुका अध्यक्षा प्रीतम पाटील, अमिता शिंदे, प्रमोद जांबेकर, दिपेंद्र आवाद, मनोज टके, ध्रुव सोष्टे, चेतन टके आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, सिद्धेश काळे, मंदार चितळे व सुदर्शन कोटकर या उच्चशिक्षित व नागोठण्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पाच तरुणांचा समावेश आहे. एक चांगला निर्णय या तरुणांनी घेतल्याचे सांगून या सर्वांचे खा. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच ना. आदिती व आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांना रोहा तालुक्यात व जिल्ह्यात काम करण्याची संधी भविष्यात दिली जाईल असेही खा. तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तर या तरुणांनीही भविष्यात प्रभावीपणे काम करून आपल्या शहरात, परिसरातील गावोगावी राष्ट्रवादीचा प्रसार कसा होईल हे पाहावे असे आवाहनही खा. तटकरे यांनी यावेळी केले.
नागोठण्यातील या तरुण कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे भविष्यात नागोठण्यातील इतर तरुणाईही राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊन पक्षाला बळकटी येण्यास नक्कीच मदत होईल असे बोलले जात आहे.








Be First to Comment