कडसुरे पाणीपुरवठा योजना भ्रष्ट्राचार प्रकरणी कारवाई करण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ : कडसुरे ग्रामस्थांचा आरोप
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील कडसुरे (ता. रोहा) गावातील नळ पाणीपुरवठा योजनेत भ्रष्ट्राचार झाल्याचे तसेच या योजनेचे अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र शिंदे दोषी असल्याचे रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अहवालात दिसून येत आहे.
याबाबतची सर्व माहिती कडसुरे ग्रामस्थांकडून राजिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयास पुराव्यानिशी सादर करूनही राजेंद्र शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने व पुढील चौकशी अहवालही त्यांनी खूप दिवसानंतरही कोकण उपायुक्तांना पाठविलेला नाही. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे कडसुरे ग्रामस्थांचे म्हणणे असून न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर ३० जून, २०२१ रोजी आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे.
रायगड जिल्हा परिषद कार्यालय समोर होणाऱ्या या उपोषणा संबंधीचे निवेदन कडसुरे ग्रामस्थांकडून संबधित सर्व शासकीय यंत्रणेला पाठविण्यात आले आहेत. उपोषणास बसणाऱ्या ग्रामस्थांमध्ये महेश शिंदे, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, संदीप शिंदे, दत्तात्रेय शिर्के व काशीराम गव्हंडकर या ग्रामस्थांचा समावेश आहे.
कडसुरे ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रोहा पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी नुसार रोहा पं.स. चे विस्तार अधिकारी जी.एल. वायळ यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले होते. त्यानुसार तक्रारदार महेश शिंदे व इतर ग्रामस्थांना तसेच पाणीपुरवठा योजना अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र शिंदे व ग्रामसेवक यांना संपूर्ण दफ्तरासह २८ जुलै, २०२० रोजी चौकशीला बोलविले होते. मात्र त्यादिवशी राजेंद्र शिंदे हे चौकशीला उपस्थित राहिले नाही.
त्यानंतर पुन्हा झालेल्या चौकशी दरम्यान ग्रामस्थांनी राजेंद्र शिंदे यांनी बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेतून ११ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी, २०२० रोजी बेरर धनादेशाद्वारे (क्र.६२८४ व ६२८५) काढलेले अनुक्रमे ३ लाख ५० हजार व ५ लाख ५० हजार असे एकूण ९ लाख रुपये काढल्याचे कागदोपत्री पुरावेच सादर केले. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचेत्यास कडसुरेचे विद्यमान सरपंच तथा योजनेचे अध्यक्ष हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्याकडून सदरची रक्कम वासूल करून त्यांचेवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) नुसार कारवाई करण्यात यावी असेही या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते.
दरम्यान याप्रकरणी कडसुरे ग्रामस्थांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चाही केली. कडसुरे पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्ट्राचार व सरकारी पैशांचा योजा अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्याकडून झालेला लाखो रुपयांचा अपहार याबाबतची सर्व माहिती लेखी पुराव्यानिशी देवूनही राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करतात की, कडसुरे ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ येते याकडे संपूर्ण नागोठणे विभागाचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कडसुरे पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी राजिपच्या ग्रामपंचायत प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-यांकडून चौकशी करण्यात आल्यानंतर माझ्याकडून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात कडसुरे पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, या योजनेचा मी २०११ पासून अध्यक्ष आहे. तर सरपंच मी आत्ता झालो असल्याने माझ्या सरपंच पदाचा या विषयाशी काही संबंध नसून बँकेतून काढलेले पैसे मी माझ्या व योजनेच्या सचिवांच्या असे दोघांच्या सहीनिशी काढले आहे. तर पैसे काढण्यासाठी मी स्वतः बँकेत गेलो असल्याने ते मी धनादेशवर सेल्फ असे लिहून पैसे काढले आहेत. त्यामुळेच मी सदर योजनेतील पैशांचा कोणताही अपहार केलेला नाही असेही राजेंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.








Be First to Comment