झोतिरपाडा ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती तरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
जात पडताळणी दाखला जात पडताळणी समितीने विहित मुदतीत पडताळणी करून न दिल्याने विरोधकांनी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार सरपंच पदावरून पायउतार झालेल्या नागोठण्याजवळील झोतीरपाडा (ता.पेण) ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती दत्ता तरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेशाद्वारे दिलासा दिला आहे. त्यामुळे सौ. ज्योती तरे यांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे.
झोतीरपाडा सरपंच सौ.ज्योती तरे या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनु.जाती.महिला राखीव प्रवर्गातून सरपंच पदी थेट जनतेतून दि.३ एप्रिल, २०१९ रोजी बिनविरोध निवडून आल्या होत्या. परंतु त्यांचा जात पडताळणी दाखला जात पडताळणी समितीने विहित मुदतीत पडताळणी करून न दिल्यामुळे तोच धागा धरून काही विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी अलिबाग यांनी त्यांना दि. १६/३/२०२१ रोजी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १०(i)अ नुसार अपात्र ठरविल्याने सौ. ज्योती तरे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
परंतु त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या सदर निर्णयाला उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान दिले. त्यावर दि. १६ जून २०२१ रोजी न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सरकारी पक्षाकडून राज्याचे अटर्नी जनरल मा. ए. पी. वनारसे यांनी युक्तिवाद करून बाजू मांडली तर ज्योती तरे यांच्या कडून ऍड. गौरव पारकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभूदेसाई यांनी अंतिम सुनावणी पर्यंत जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
सौ. ज्योती तरे यांनी मा. उच्च न्यायालयाची निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग तसेच पंचायत समिती कार्यालय पेण यांना देऊन. आज दि. २३ जून रोजी सकाळी १०:००वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून झोतिरपाडा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नरेश काशिनाथ पाटील, सौ.प्रणाली जयेश पाटील विद्यमान सदस्या, शिवसेना महिला विभाग संघटिका सौ.सरिता पाटील, शिवसेना महिला उपविभाग संघटिका सौ.सुषमा वारंगे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका संघटिका सौ.वरुणा तरे, दीपाली तरे तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील, महाराष्ट्र जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कुथे (पुजारी) व काही निवडक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारून गावाच्या सेवेकरिता हजर झाल्या आहेत. शिहू विभागात ही बातमी समजताच सौ. ज्योती तरे यांच्यावर फोन, सोशियल मीडिया याद्वारे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment