रान भाज्यांना चांगली मागणी
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगली सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी हिरवळ मोठ्या प्रमाणावर पसरलेली दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसात आदिवासी भगिनी जंगलातील रानभाज्या सर्रासपणे बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.
या रानभाज्या मध्ये शेवळा, माट, कंटोरली, कुड्याच्या शेंगा, वडीची पाने,व काजू गार आदी प्रकारच्या रानभाज्या कोलाड, रोहा येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून यामुळे आदिवासी समाजाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सुटलेला आहे. इतर भाजीपाल्याचे रेट वाढत असतांना रानभाज्याच्या किंमती लोकांना परवडणाऱ्या असल्यामुळे या भाज्यांना वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे शेवळाची एक जुडी रुपये १० पासून तर माटाची ही जुडी हि १५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. इतर भाज्यांपेक्षा रानभाज्या अधिक चविष्ट असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अधिक मोठ्या प्रमाणावर या भाज्यांना मागणी असते.
या रानभाज्या श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात. रान भाज्यांमुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी प्राप्त होत असते.परंतु या भाज्या आणण्यासाठी डोंगर, दऱ्याखोऱ्यात जावे लागते, मेहनत जास्त परंतु खर्च कमी असल्यामुळे या भाज्या कमी किमतीत विकल्या जातात.








Be First to Comment