Press "Enter" to skip to content

लघुग्रहांच्या शोध मोहिमेमध्ये खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे आणि टीमचे यश

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था नासा ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेअंतर्गत खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व त्यांच्या टीमने ६ लघुग्रहांचा प्राथमिक शोध लावला असल्याची माहिती ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.

नासा ने सुरू केलेल्या लघुग्रह शोध मोहिमेमध्ये मंगळ व गुरु ग्रहांच्या मध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह शोधण्याचे विशेष कार्य होते, परंतु खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व त्यांच्या टीमने केलेल्या निरीक्षणांमध्ये ६ लघुग्रह सापडले त्यातील ३ लघुग्रह विशाल कुंभारे यांनी शोधले आहेत. या ६ लघुग्रहांची प्राथमिक शोध यादीमध्ये नोंद झालेली आहे. त्यानंतर लघुग्रहांचे व त्याच्या हालचालींचे निरीक्षण करून त्याची सत्यता पडताळून त्याचे नामकरण केले जाईल. या प्रक्रियेसाठी ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागतो, असे विशाल कुंभारे यांनी महितीद्वारे सांगितले .

हि लघुग्रह शोध मोहीम ३ मे ते २८ मे २०२१ दरम्यान राबविली गेली. यासाठी लागणारी निरीक्षणे अमेरिकेच्या हवाई बेटावरील पॅन स्टार्स टेलिस्कोप मधून घेतली गेली होती. या शोधमोहिमे मध्ये कुंभारे यांना सोवन आचार्य, सा सिटीझन सायन्स ग्रुप व इतर ४ निरीक्षकांचे सहकार्य मिळाले आहे .

मंगळ व गुरु ग्रहांच्या मधील लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात, प्रत्येक लघुग्रहाची परिभ्रमणाची वेळ व गती सारखी नसते, त्यामुळे ते एकमेकांवरती आदळून त्यांचा मार्ग बदलू शकतात, असे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची व पृथ्वीवरती आदळण्याची शक्यता असते. म्हणून लघुग्रहांचे सतत निरीक्षण करणे व त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच लघुग्रहांच्या अभ्यासातून ग्रहांची व सूर्यमालेची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचे काही योगदान आहे का? अश्या बऱ्याच रहस्यांचा उलगडा लघुग्रहांच्या निरीक्षण व संशोधनातून करता येतो, असे कुंभारे यांनी सांगितले.

अशी लघुग्रह शोध मोहीम शालेय विद्यार्थ्यांमध्ये राबवून त्यांच्यातील अवकाश संशोधन वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व त्यांची टीम करत आहे. विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन लघुग्रहांचे निरीक्षण व संशोधन करावे असे आवाहन देखील शेवटी विशाल कुंभारे यांनी या माध्यमातून केले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.