Press "Enter" to skip to content

नागोठणे हायस्कूलच्या उड्डाण पुलाच्या कामास लवकरच सुरुवात

खासदार सुनिल तटकरे यांनी केली महामार्गाची पाहणी : अधिकारी वर्गाला दिल्या कडक शब्दात सूचना

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यासमवेत कोलाड ते नागोठणे पर्यंतच्या महामार्गाच्या कसमाचा पाहणी दौरा केला.

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाच्या परिसरातील महामार्गाची पाहणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे आले त्यावेळी त्यांनी विद्यासंकुलात जाण्यासाठी मंजूर झालेल्या उड्डाणपुला संदर्भात अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली व या कामास तात्काळ प्रारंभ करा अशा सुचना केल्या. त्यावेळी उपस्थित अधिका-यांनी सुचना तात्काळ मान्य करून थोड्याच दिवसात उड्डाण पुलाच्या कामास सुरुवात करू अशी शाश्वती खासदार तटकरे यांना दिली. त्यामुळे पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे.

को.ए.सो च्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर, ज्युनिअर काॅलेज व आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात सुमारे तीनहजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा व कॉलेज मध्ये जाताना विध्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून जावे लागत असते. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे महामार्गाच्या कामास सुरवात झाली त्यावेळीच स्थानिक शाळा समिती अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी विद्यासंकुलासमोर उड्डाण पूल व्हावा यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर याबाबत खासदार सुनिल तटकरे यांनी लक्ष घालून केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुलासाठी मंजुरी मिळवून दिली होती परंतु काही कारणामुळे पुलाचे काम रखडले होते.

खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामकाजामुळे निर्माण झालेल्या कोलाड विभागासह वाकणनाका, चिकणी गावाच्या हद्दीतील रेल्वे भरावामुळे रोडवर पाणी साचून हॉटेल गुलमोहर पर्यंत रस्ता बंद होतो तो भाग, नागोठणे भातगिरणी परिसर व को. ए. सो. च्या हायस्कुल परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार तटकरे म्हणाले की, वाकणनाका हा प्रसिद्ध नाका असून राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांच्या चुकीच्या नियोजना मुळे येथील ४० ते ५० वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीचे वेळ येणार असून त्याबाबत योग्य ते नियोजन करा. तसेच नागोठणे भातगिरींणी संस्थेचे हजोरो संख्येने सभासद असून भातगिरणीच्याही समस्या तसेच ग्रामस्थांच्या सर्व समस्याही तात्काळ सोडावा अन्यथा आम्ही आता शांत बसणार नाहीत. तसेच संबंधितांवर भारतीय दंड संविधानाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. अशा कडक शब्दात अधिका-यांना खासदार तटकरे यांनी खडसावले.

दरम्यान लवकरच केंद्रीय बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या समवेत बैठक घेऊन महामार्ग बाबतच्या सर्व समस्यांवर चर्चा करणार असल्याचे यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितले.

यावेळी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, आंबेवाडी सरपंच सुरेशशेठ महाबळे, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, हरिषशेठ काळे, मधुकर ठमके, विलास चौलकर, पांडुरंग गायकर, शिवसेनेचे पाटणसई उपसरपंच सुरेश गायकर, पाटणसई ग्रा. स. सचिन कळसकर, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, नडवली सरपंच महेंद्र पोटफोडे, राकेश शिंदे, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम राणे, कृष्णा मिणमिने, परशुराम तेलंग तसेच मधुकर गायकर, दिलीप अवाद, महेंद्र हंबीर, महिला तालुका अध्यक्ष अमिता शिंदे, उपाध्यक्ष विजया कोतवाल आदींसह संबंधित अधिकारी व ठेकेदार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.