अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून दोन महिन्यात 200 कोरोना रुग्णांची विनामूल्य सेवा
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर रात्री अपरात्री कधीही अपघात घडल्यास त्यांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देऊन वाचविणारा आणि आता दोन महिन्याच्या कालावधीत साई सहारा प्रतिष्ठान पेणच्या माध्यमातून 200 कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकेतून विनामूल्य जिवाची धडपड करणारा पेणचा खरा देवमाणूस कल्पेश ठाकूर ठरत आहे.
कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपुर्ण जगात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून जवळची नाती दुरावली आहेत कोरोनाच्या भीतीने कोरोना रुग्णांकडे संगळ्यांनी पाठ फिरवली असतांनाच या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कल्पेश ठाकूर सारखा तरुण पुढे आला असून त्यांनी मुंबई- गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांसह कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.
नुकत्याच झालेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कल्पेश ठाकूर यांचे भरभरून कौतुक केले.या तरुणाचा आर्दश इतरांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कल्पेशनी जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत पेण ते अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, कर्जत येथे जवळपास 200 कोविड रुग्णांना कोणताही मोबदला न घेता विनामूल्य सेवा देण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे.
आपला हॉटेल व्यवसाय सांभाळत असतानाच कोरोना ग्रस्तांच्या मदतीला कल्पेशने नेहमीच धाव घेतली आहे. विनामूल्य सेवा देण्या-या कल्पेश ठाकूरला आतापर्यंत अनेक पुरस्कारांंनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यामुळे अपघातग्रस्त तसेच कोरोना रुग्णांना मदत लागल्यास 9225714555 या मोबाईल नंबर वर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन कल्पेश ठाकूर यांनी केले आहे.









Be First to Comment