श्रद्धा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे यासाठीचे उपोषण चार तासात मागे
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला मंजुरी मिळून तसेच निविदा काढून बरेच दिवस झाले तरी या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. ते काम त्वरित सुरू करावे यासाठी त्या भागातील तीन नगरसेवक व एका सामाजिक कार्यकर्त्याने आज सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू केले. मात्र कामाचे कार्यादेश दिल्याने व चार – पाच दिवसात रस्त्याची आखणी करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने हे उपोषण दुपारी 3 वाजता मागे घेण्यात आले.
हा रस्ता आधी होणार होता परंतु हे एकच काम दोन नावाने मंजूर झाल्याने या रस्त्याच्या कामाला तांत्रिक दृष्ट्या विलंब होत गेला. त्यांनतर डोणे ते खोपोली हा रस्ता होणार होता परंतु त्यासाठी केवळ दीड कोटी रुपये खर्च होणार होते. त्यामुळे त्याला विरोध करण्यात आला होता. त्यांनंतर एम एम आर डी ए च्या माध्यमातून हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा नगरपरिषदेकडून काढण्यात आली. मात्र कामाचे कार्यदेश काढण्यात आले नव्हते त्यामुळे काम सुरू होण्यासाठी अडचण निर्माण होत होती.
हा रस्ता लवकर व्हावा यासाठी विद्यमान नगरससेविका पुष्पा दगडे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ठोंबरे अलगीकरणात असल्याने यांच्या व्यतिरिक्त अन्य तीन जणांनी आज दि.1 जून रोजी 11 वाजता श्रद्धा हॉटेल नजीक उपोषण सुरू केले. यावेळी विरोधी पक्षनेते शरद लाड, माजी नगरसेवक अशोक राऊत, सीताराम कांगणे, रघुनाथ ठाकरे आदींनी पाठिंबा दिला.
दुपारी तीनच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, पोलीस निरीक्षक अरुण भोर, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, अभियंता मनीष गायकवाड, सारिका कुंभार, नगर रचना सहाय्यक लक्ष्मण माने, रवींद्र लाड उपोषणस्थळी आले. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ‘ठेकेदार कंपनीने ऑन लाईन बयाणा रक्कम 4 लाख 94 हजार 965 आणि आज काही मिनिटांपूर्वी अनामत रक्कम 4 लाख 50 हजार भरल्यामुळे त्यांना कामाचे कार्यदेश दिले आहेत तसेच चार – पाच दिवसात रस्त्याची लाईन आऊट देण्यात येईल. व काम सुरू करण्यात येईल.’ असे सांगितले. उपोषणकर्त्यांनी ‘ हा रस्ता 13 मिटर रुंदीचा झाला पाहिजे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकामाचा बहाणा सांगू नये. लवकरात लवकर काम सुरू करून चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे.’ असे स्पष्ट केले.
त्यांनतर थंड पेय घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष ॲड. रंजना धुळे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेविका मधुरा चंदन, भारती पालकर, सुवर्णा निलधे, पूजा सुर्वे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन राजेश लाड यांनी केले.








Be First to Comment