Press "Enter" to skip to content

चंद्रकांत दादांचा आता थेट अजित दादांना दम !

अजितदादा संभाळून बोला मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल : चंद्रकांत पाटील

सिटी बेल । कोल्हापूर  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

अजित पवार यांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे आपण ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

काय म्हणाले होते अजित पवार ?

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला.

ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असे अजित पवार यांनी सांगितले होते.



कोरोना काळात संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका भाजपला अमान्य

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या सर्व मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे. केवळ कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजे यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. राज्यात सगळं सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, शांत बसा, हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील तर भाजप त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.