Press "Enter" to skip to content

बेवारस मृत देहाचा आत्मा नक्कीच सुखावला असेल

खालापूर पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि खिदमते हल्क सामाजिक संस्था यांनी केले बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

सिटी बेल । खालापूर । गुरुनाथ रामचंद्र साठेलकर ।

२२ मी रोजी पहाटेच्या दरम्यान, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एका व्यक्तीचा हाळ या गावा जवळ अपघात झाला होता. त्याच्या दोन्ही पयाना गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्याला खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तो आपले नाव आणि पत्ता सांगू शकत नव्हता. तरीही त्याच्या जखमा गंभीर असल्याने प्रथोमपचार करून, महाराष्ट्र शासनाच्या १०८ यंत्रणेमार्फत पुढे हलविण्यात आले. दुर्दैवाने त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती आणि त्यात त्याला कोणत्या वाहनाने धडक दिली होती हे देखील समजले नव्हते. दुर्दैवाने त्याला पुढे नेत असताना अती रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने त्यांच्या संदर्भातील माहिती विचारण्यासाठी मला पोलीस कर्मचारी तुषार सुतार, म्हात्रे यांचे फोन येत होते, त्याच प्रमाणे दोन दिवसांपूर्वी खालापूरचे पोलीस उप निरीक्षक बजरंग रजपूत यांचा मला कॉल आला मला वाटलं की तो फोनही तसाच असेल. मात्र रजपूत यांनी सांगितले की, आम्ही अपघातात मदत केलेल्या व्यक्तीचे कोणी नाते संबंधी नसल्याने, तीची पोलीस रेकॉर्डमध्ये बेवारस अशी नोंद झाली आहे, मात्र तीचे नियमाप्रमाणे विधिवत अंत्यसंस्कार करावयाचे आहेत, त्यासाठी तुमच्या संस्थेची मदत लागेल. नेहमीच अशा प्रसंगी मदत करत असतो, त्यामुळे त्यानां मी होकार कळवला.

मी हनीफ कर्जीकर यांना सोबत घेतले. हनीफ भाईने “खिदमते हल्क सामाजिक संस्था खोपोलीचे” अध्यक्ष अयुब खान यांना अंत्यसंस्कार करायचे असल्याने आपली मदत होईल का ,? अशी विचारणा केली. तेंव्हा, मृत व्यक्ती ही हिंदू कि मुसलमान हे न विचारता त्यानी तात्काळ होकार दिला. योगायोगाने मृत व्यक्ती हि मुस्लिम धर्मीय होती हे त्याच्या शरीरावरील काही जुजबी खुणांमुळे स्पष्ट झाले त्यामुळे अंत्यविधी मुस्लिम पद्धतीने खोपोली येथील कब्रस्थानमध्ये करायचे निश्चित झाले.

“खिदमते हल्क सामाजिक संस्थेचे” अय्युब खान, यरहा खान, अब्दुल अलीम, नईम खान, जावेद खान, अस्लम गोरी, नदीम मतारे, यासिन सय्यद हे सदस्य लागलीच तयारीला लागले. कब्र खोदण्यापासून अंत्यविधीसाठी साहित्य आणण्याची लगबग सुरू झाली. निजामुद्दीन जळगावकर यांनी देखील जे काय हवे नको ते याकडे लक्ष दिले. नेहमीप्रमाणे बेवारस मृत व्यक्तीला निशुल्क ऍम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या यासिन शेख यांनी कर्जतच्या शवागरातून मृतदेह आणण्याचा बंदोबस्त केला होता. आम्ही देखील जेवढी होता येईल तेवढी मदत करत होतो.

बेवारस म्हणून समजल्या जाणाऱ्या त्या मृत व्यक्तीसाठी, एक दोन नव्हे तर चक्क दहाबारा समाज बांधव आणि आमच्या सारखे काहीजण कर्तव्य भावनेने पुढे आले होते. मृतदेहावर आपल्या नातलगामाणे सर्वांनी मिळून विधिवत संस्कार केल्या नंतर बकायदा नमाज अदा करून त्याच्या आत्म्याला शांती देण्यासाठी प्रार्थना केली गेली. शेवटी त्या मृत व्यक्तीला भावपूर्ण मनाने कबरीमध्ये दफन केले गेले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या सर्व घडामोडींचा साक्षीदार होण्याचं पुण्य लाभलं असं त्यावेळी पोलीस उप निरीक्षक बजरंग रजपूत यांनी मला बोलून दाखवलं. दोन पोलीस कर्मचारी व ते स्वतः सगळे सोपस्कार होईपर्यंत आमच्या सोबत होते. सगळे विधी पार पडल्यानंतर रजपूत साहेबांनी या सर्वाचा खर्च किती झाला ? अशी व्यवहारिक विचारणा केली असता, सर्वांनी हात जोडून हे आमचे नैतिक कर्तव्य असल्याचे सांगितलेयोगायोगाने ती व्यक्ती मुस्लिम होती त्यामुळे आमची सेवा कबूल झाली असेल आणि त्याचे पुण्य आम्हाला मिळेल मनोगत व्यक्त केलं.

या सगळ्या प्रकाराने भारावून गेलेल्या रजपूत साहेबानी “खिदमते हल्क सामाजिक संस्थेच्या” क्रांतीनगर येथील कार्यालयात जाऊन त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली आणि पोलीस प्रशासनच्या वतीने आभार मानले. अडल्या नडल्यांसाठी निस्वार्थी आणि निशुल्क सेवा देणाऱ्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य सभासदांचे त्यानी कौतुक केले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या वतीने देखील सर्वांचे आभार व्यक्त केले गेले. जाता जाता कब्रस्थान येथील आसन व्यवस्थेसाठी फुल न फुलाची पाकळी अश्या स्वरूपात रजपूत साहेबानी स्वखर्चाने खुर्च्या देणार असल्याचे सांगितले.

हा घटनाक्रम म्हणजे कागदोपत्री बेवारस मृतदेहाची व्हिलेवाट लावण्याचा प्रकार असतो, मात्र तो घटनाक्रम म्हणता म्हणता समाज बांधवांच्या कर्तव्य निष्ठेचे उदाहरण होऊन गेला. त्या मृतात्म्याची दुवा सगळयांना मिळाली असेलच, मात्र एक शुद्धभाव यातून उत्सर्जित झाला होता, या सेवेला नशीब लागतं असंच अनुमान यातून निघालं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.