पेण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती दर्शन बाफणा यांचे तहसिलदारांना निवेदन
सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू केली आहे. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह शहरात सुध्दा लसीकरणाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरातील काही भागात असणारे शारीरीक व्याधीग्रस्त रुग्ण ज्यांना लसीकरणासाठी केंद्रावर येता येत नाही अशा रुग्णांचे शासनाने घरीच लसीकरण करावे या मागणीचे निवेदन पेण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती दर्शन बाफणा यांनी पेण तहसिलदार यांना दिले आहे.
या निवेदनाद्वारे त्यांनी अशी मागणी केली आहे की शहरातील अनेक रुग्ण शारीरिक व्याधीमुळे अंथरुणाला खिळलेले आहेत त्यांना लसीकरण केंद्रावर आणणे कुटुंबीयांतील व्यक्तींना जिकिरीचे होत असल्याने यामुळे हे रुग्ण यापासून वंचित राहता कामा नये त्यामुळे प्रशासनाने अशा रुग्णांचे आठवड्यातुन किमान दोन दिवस तरी घरी जाऊन लसीकरण करावे यासाठी जाण्या येण्या-या परिचारिकांची व्यवस्था आमच्या मार्फत मोफत करण्यात येईल तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणा-या विद्यार्थ्यांचे सुध्दा लसीकरण होणे अनिवार्य असल्याने त्यांचीही विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सभापती दर्शन बाफणा यांनी पेण तहसिलदारांसह जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पेण वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे केली आहे.







Be First to Comment