कर्जतमध्ये 14 कोटींच्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीची आजी – माजी आमदारांनी केली वेगवेगळी भूमीपूजन
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत तालुका प्रशासकीय भवन इमारतीला मुहूर्त मिळाला आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्याला गालबोट लागले. महाआघाडीतील मित्र पक्षातील आजी – माजी आमदारांनी दीड तासाच्या अंतराने आपल्या हस्ते वेगवेगळी भूमिपूजन केली. त्यामुळे महाआघाडीतील तालुक्यातील बिघाडी चव्हाट्यावर आला आहे.
कर्जत या तालुक्याचे ठिकाणी पोलीस परेड मैदानाच्या तलाठी कार्यालयाच्या जमिनीवर भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे महा आघाडीचे सरकार असतानाही शासकीय नियमानुसार निमंत्रण पत्रिका नव्हती. तसेच महा आघाडीतील अन्य कोणत्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता. आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षाचे चिन्ह वापरून शिवसेनेच्या झेंड्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा ॲड. रंजना धुळे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अतुल कडू, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके, नगरसेवक – नगरसेविका आदींच्या समवेत समारंभ ठिकाणी जाऊन पावणे दहाच्या सुमारास प्रतिकात्मक भूमिपूजन करून निषेध नोंदवला.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार लाड यांनी, ‘अनेक वर्षांपासून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत यासाठी प्रादेशिक कृषी केंद्राच्या जागेची मागणी केली होती. ती मान्य झाली नाही. मागच्या सरकारमध्ये असलेल्या पालकमंत्री, अर्थमंत्री यांची अजित पवार, सुनील तटकरे यांच्या समवेत भेट घेतली. त्यावेळी प्रशासकीय भवनाच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यांनंतर निवडणूक आल्या. महाआघाडीचे सरकार आले. मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे मंजूर कामांना स्थगिती आली. आम्ही पुन्हा आत्ताच्या पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना अजित पवार व सुनील तटकरे यांच्या समवेत भेटलो व हे काम मार्गी लागत आहे. खरे तर शासकीय नियमानुसार कार्यक्रम पत्रिका असायला हवी होती परंतु आमदारांनी पक्षाचा कार्यक्रम आहे तसे पक्षाचे चिन्ह वापरून अशा प्रकारे भूमिपूजन समारंभाचे आयोजन केले आहे. म्हणून आम्ही येथे येऊन हे प्रतिकात्मक भूमिपूजन केले आहे. शासकीय निधी हुकूमशाही पद्धतीने पक्षाचा निधी वापरल्यासारखा हा प्रकार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.’ असे स्पष्टपणे सांगितले.
त्यांनतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास या प्रशासकीय भवनाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, सभापती सुषमा ठाकरे, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, महिला आघाडी प्रमुख रेखा ठाकरे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, भरत भगत, नगरसेवक राहुल डाळिंबकर, नितीन सावंत, उपअभियंता अजयकुमार सर्वगौड, गट विकास अधिकारी बालाजी पुरी, मुख्याधिकारी पंकज पाटील,मोहन ओसवाल, आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार थोरवे यांनी , ‘कोरोनाचे संकट असल्याने हा समारंभ घाई गडबडीत होत आहे. तसेच पावसाळा जवळ आल्याने लवकरात लवकर भूमिपूजन व्हावे म्हणून हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या भवनाचे उदघाटन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आपण करू. मागील सरकारमधील पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा प्रशासकीय भवन होण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते. हे प्रशासकीय भवन होण्यासाठी उप अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी अथक मेहनत घेतली आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हे उभे राहणार आहे. कोणाला राजकारण करायचं आहे त्यांना करू द्या आपण विकास कामे करू. आतापर्यंत दोनशे कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला आहे. त्यांना पराभव पचवता येत नाही. पंधरा वर्षात विकास झाला नाही म्हणून आम्हाला तो करावा लागत आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने भूमिपूजन केले आहे. आतापर्यंत आम्ही संयम राखला या पुढे आम्ही त्यांच्या दादागिरीला भीक घालणार नाही.
कर्जत शहरातील पोलीस मैदान भागातील तहसीलदार निवासस्थान,तेथील तलाठी कार्यालये, मंडळ अधिकारी कार्यालये यांच्या ठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्याबाबत तेरा - चौदा वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावीत यासाठी ते प्रयत्नशील होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 2014 मध्ये आराखडा तयार केला. तत्कालीन आमदार सुरेश लाड असताना राज्यात भाजप-सेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर होते.त्यामुळे लाड यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कर्जत प्रशासकीय भवन इमारतीला तांत्रिक मान्यता देत 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.परंतु त्या कामाची निविदा काही सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षे काढली नव्हती. ठेकेदार कंपनीने ही निविदा 14 कोटी 21 लाख रुपयांना स्वीकारली असून पोलीस मैदानाच्या बाजूला असलेल्या जमिनीवर तीन मजली प्रशासकीय भवन आता उभे राहणार आहे. 2850 चौरस मीटरचे बांधकाम केले जाणार असून राज्य शासनाची एकूण 12 शासकीय कार्यालये तेथून कामकाज करतील. हे प्रशासकीय भवन व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्वाचे ठरले. मात्र आजी - माजी आमदारांनी एकाच प्रशासकीय भवनाचे वेगवेगळे भूमिपूजन केल्याने हे काम पूर्ण होईल ना? अशी शंका तालुक्यात व्यक्त होत आहे.








Be First to Comment